जयंत पवार, अशोक सराफ, सुषमा अभ्यंकर मानकरी

अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या वि. वा. शिरवाडकर नाटय़लेखन, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी आणि नटश्रेष्ठ बाबुराव सावंत नाटय़कर्मी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

या तीनही पुरस्कारांसाठी अनुक्रमे नाटककार जयंत पवार, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ लेखिका सुषमा अभ्यंकर यांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार वितरण सोहळा येत्या २७मे रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे.

सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या सोहळ्यास अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर हे अध्यक्ष तर अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी व प्रमुख कार्यवाह दिपक करंजीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.