मराठी चित्रपटांसाठी हक्काची चित्रपटगृहे नाहीत, ही मराठी चित्रपट निर्मात्यांची ओरड नेहमीचीच आहे. अनेकदा एकाच दिवशी हिंदी चित्रपट व मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटांना चित्रपटगृहेच उपलब्ध नसतात. आता मात्र हे ‘दुखभरे दिन’ संपुष्टात येणार आहेत. मराठी चित्रपटांसाठी प्रत्येक तालुक्यात हक्काचे चित्रपटगृह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत राज्य सरकारने नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत असा प्रस्ताव आला असून त्यावर ४ डिसेंबर रोजी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आता ‘अब सुख आयो रे.’ अशी परिस्थिती अवतरण्याची शक्यता आहे.
सांस्कृतिक खात्यातर्फे चित्रनगरीत झालेल्या बैठकीसाठी चित्रपट महामंडळाचे काही पदाधिकारी, संबंधित खात्याचे अधिकारी, चित्रनगरीचे संचालक लक्ष्मीकांत देशमुख आदी हजर होते. या बैठकीत प्रत्येक तालुक्यात खास मराठी चित्रपटांसाठी २०० आसनक्षमतेचे छोटेखानी चित्रपटगृह बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाबाबत सकारात्मक विचार सुरू असून येत्या ४ डिसेंबर रोजी त्याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी या माहितीला दुजोरा दिला. या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या नाटय़गृहांचे रूपांतर चित्रपटगृहात करण्यात यावे. या सभागृहात नाटके आणि चित्रपट दोन्ही दाखवण्याची व्यवस्था असावी, असा प्रस्तावही महामंडळाने सरकारला दिल्याचे त्यांनी सांगितले.
‘भारतीय’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी ‘एक था टायगर’ने सर्वच चित्रपटगृहे अडवून ठेवल्याने ‘भारतीय’ची मोठीच पंचाईत झाली होती. या दरम्यान ‘लोकसत्ता’नेही मराठी चित्रपटांसाठी खास चित्रपटगृहे असावीत, याकडे लक्ष वेधले होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी महामंडळातर्फे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सुर्वे यांनी दिले होते. त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करत याबाबत बैठक घेतली. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी १०-१५ गुंठे जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी योजना असल्याचे सुर्वे यांनी सांगितले.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने प्रत्येक तालुक्यात सामाजिक सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी काही निधी दिला आहे. या निधीतून ही सर्व छोटेखानी चित्रपटगृहे तालुक्याच्या ठिकाणी उभी राहणार आहेत.    

दादासाहेब फाळके चित्रनगरीत झालेल्या बैठकीत अशा प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. या प्रस्तावाबाबत ४ डिसेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक होणार असून त्यातच याबाबत निर्णय होईल. मात्र तोपर्यंत याबाबत काही बोलणे योग्य नाही.
– लक्ष्मीकांत देशमुख
संचालक , दादासाहेब फाळके चित्रनगरी

drishyam-hollywood-remake
‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक
do-you-know-who-is-this actress
फोटोमध्ये पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठीबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही कमावतेय नाव
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा
ravi-kishan
“हिंदी चित्रपटसृष्टीने माझ्या…” प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी व्यक्त केली बॉलिवूडविषयी खंत