टाळेबंदीमुळे नाटय़कर्मीवर उपासमारीची वेळ; रंगमंच कामगारांसहित कलाकार, लेखक, दिग्दर्शक, निर्मातेही अडचणीत

निलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : ऐन उन्हाळ्याच्या हंगामात नाटक बंद असल्याने कमावण्याचे सर्वच दिवस टाळेबंदीत निघून चालले आहेत. त्यामुळे नाटय़क्षेत्रातले रंगमंच कामगारच नाही तर कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्मातेही अडचणीत आले आहेत. त्यामुळे उद्याच्या जगण्याची भ्रांत रंगमंच कामगारांना लागली आहे, तर त्यांना जगवण्यासाठी काय करता येईल या विचारात निर्माते आहेत. यामध्ये निर्मात्यांचेही नुकसान कोटय़वधींच्या घरात गेले आहे.

काही दिवसांपूर्वी रंगमंच कामगार आणि पडद्यामागील कलाकारांच्या मदतीसाठी कलाकारांकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लोकांनी मदत केली. परंतु कामगारांची परिस्थिती कल्पनेपेक्षा अधिक गंभीर असल्याचे लेखक-दिग्दर्शक विजू माने सांगतात. ‘पडद्यामागील कलाकारांना एक हजार रुपये आणि वाणसामान देण्याच्या निमिताने अनेक कामगार संपर्कात आले. घरात भूक आणि बाहेर आजार अशा दुहेरी संकटात ते सापडले आहेत. हे नक्की कधी संपेल याचा काहीच अंदाज नसल्याने अनेकांना उद्याच्या जगण्याची चिंता भेडसावू लागली आहे. हातावर पोट असलेला हा वर्ग खऱ्या अर्थाने उपासमारी जगत आहे. अनेक कलाकार आपल्या आर्थिक अडचणीबाबत मौन बाळगत आहेत. म्हणून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून मला आवाहन करायचे आहे की, ज्या कलाकारांना आर्थिक अडचण निर्माण झाली आहे, त्यांनी आमच्याशी न संकोचता संपर्क साधावा आणि दातृत्वाची भावना असलेल्या कलाप्रेमींनी कलाकारांच्या मदतीसाठी आर्थिक सहाय्य करावे,’ असे आवाहन माने यांनी के ले.

अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक असे आहेत जे केवळ नाटकांवर निर्भर आहेत. अशा सर्वाच्याच उपजीवीकेला खीळ बसली आहे. ‘काही कलाकार नाटक सुरू असतानाच मालिका किंवा तत्सम काम करत असतात, अशा कलाकारांना आधीच्या बचतीवर काही काळ काढता येईल. परंतु जे कलाकार पूर्णवेळ नाटक करतात, त्यांच्या पुढे खरा उपजीविकेचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे टाळेबंदीनंतरही नाटक व्यवसाय रुळावर यायला बराच वेळ जाईल. त्यामुळे हा पाच ते सहा महिन्यांचा काळ कसा काढायचा असा प्रश्न कलाकारांपुढे आहे,’ असे अभिनेत्री मानसी जोशी सांगते. तर ‘नाटय़संमेलनाला शासनाने जाहीर केलेला दहा कोटींचा निधी नाटय़ परिषदेने अडचणीत सापडलेल्या रंगमंच कामगार आणि कलाकारांसाठी वापरावा,’ अशी मागणी दिग्दर्शक राजेश देशपांडे करतात. त्यांच्या मते, मनोरंजन ही माणसाची सर्वात शेवटची गरज असल्याने हे चित्र सावरल्यानंतरही कलाक्षेत्र कधी सावरेल याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे प्रश्न केवळ कामगारांचा नाही तर कलाकार, लेखक, दिग्दर्शक, व्यवस्थापक, निर्माते ही एकूण फळीच अडचणीत आली आहे. पुन्हा नाटकाची घडी बसवताना नाटय़ संस्था, नाटय़गृह आणि शासनाने मिळून यावर मार्ग काढायला हवा.

‘साधारण पन्नास दिवसांचे प्रयोग, एकूण नाटक आणि निर्मिती संस्था यांचा आढावा घेतला तर नुकसान कोटींच्या घरात आहे. ते भरून काढणे शक्य नाही. हा हंगाम नाटकाचा आहे. पावसाळा सुरू झाल्यावर प्रयोग फार होत नाही. त्यामुळे निर्मात्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे,’ अशी खंत नाटय़निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, शासनाच्या मदतीशिवाय ही कलासृष्टी पुन्हा उभी राहणार नाही. म्हणून सर्व सुरळीत झाल्यानंतर शासनाने नाटकाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

नुकसान किती झाले, हे सांगता येणे कठीण आहे. कारण टाळेबंदी वाढली आहे. परिस्थिती स्थिरावल्यावर एकूण तोटय़ाचा अंदाज येईल.

– प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद

मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक नुकसान नाटकाचे होणार आहे. करोनाचे सावट पूर्णपणे दूर झाल्याशिवाय हा व्यवसाय उभा राहणार नाही. नक्की कशा प्रकारचे आणि किती सहाय्य अपेक्षित आहे, याचा अनुभवी आणि तज्ज्ञमंडळींकडून अहवाल तयार करून तो शासनाला देणे गरजेचे आहे. त्या दिशेने आताच विचारपूर्वक पावले टाकायला हवी.

– अजित भुरे, अध्यक्ष, व्यावसायिक नाटय़निर्माता संघ.