मुंबई : गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ रंगभूमीच्या सेवेसाठी अविरत कार्यरत असलेले ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. बुधवारी रात्री उशिरा अंधेरी (पू.) येथील पारसीवाडा स्मशानभूमीत काकडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी काकडे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. परंतु, त्यावरही त्यांनी मात केली. ते पूर्णपणे बरे झाले आहेत, असे वाटत असतानाच बुधवारी दुपारी २च्या सुमारास विलेपार्ले येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

‘काकडे काका’ या नात्यानेच रंगभूमीवरील प्रत्येकाशी प्रेमाने जोडले गेलेले अरुण मनोहर काकडे हे मूळचे सोलापुरातील माळशिरसचे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांची नाटकाशी नाळ जुळली. पुण्यात वाडिया महाविद्यालयात शिक्षण घेत असताना प्राध्यापक भालबा केळकर यांच्या नाटकांमधून त्यांनी काम केले. त्यानंतर पुण्यातच ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोशिएशन ऑफ पुणे’ या संस्थेशी ते जोडले गेले. अर्थात, नाटय़चळवळीत त्यांचा सहभाग वाढला तो मुंबईत आल्यानंतरच.

नोकरीसाठी मुंबईत आलेले अरुण काकडे रंगायनशी जोडले गेले. विजयाबाई मेहता, अरविंद देशपांडे यांच्यासारख्या नाटय़धुरीणांबरोबर त्यांनी रंगायन चळवळ १४ वर्षे सुरू ठेवली. रंगायनमधून बाहेर पडल्यानंतर दादरच्या छबिलदास शाळेत नव्याने प्रायोगिक नाटकांची ही चळवळ उभी राहिली. सुलभा देशपांडे त्यावेळी छबिलदास शाळेत शिक्षिका होत्या. त्यांच्या प्रयत्नांतून शाळेत प्रायोगिक नाटकासाठी जागा मिळाली. त्याकाळी ‘छबिलदास नाटय़चळवळ’ म्हणून ती गाजली. पुढे माहीमच्या शाळेत ‘आविष्कार’चे कार्यालय थाटले गेले आणि तिथेच अगदी अखेरच्या क्षणापर्यंत अरुण काकडे यांनी आविष्कार अंतर्गत प्रायोगिक आणि समांतर नाटय़निर्मितीचे कार्य सुरू ठेवले होते.

गिरीश कार्नाड यांचे ‘तुघलक’, विजय तेंडुलकरांचे ‘येथे पाहिजे जातीचे’ यासारखी नाटके  अविष्कारने रंगभूमीवर आणली. याच काळात बालनाटय़ांची निर्मितीही काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ते एकही दिवस न चुकता माहीममधील आविष्कारच्या कार्यालयात हजेरी लावत. प्रायोगिक रंगभूमीला जागा मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यापासून नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या कार्यकाळात त्यासाठी आंदोलन करण्यातही काकडे कायम पुढे होते.

‘आविष्कार’चे स्वप्न अधुरे

‘आविष्कार’साठी कायमस्वरूपी जागा मिळाली तर नव्या प्रायोगिक रंगकर्मीसाठी त्यांचे प्रयोग साकारण्यासाठी मदत मिळेल, तिथे प्रायोगिक रंगभूमी बहरेल, हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी गेली पाच वर्षे त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांकडे पाठपुरावाही केला होता. मात्र, त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

प्रायोगिकमधील काम वाखाणण्याजोगे

काकडे काकांशी माझा ४० वर्षांपासून परिचय आहे. ‘गर्दीत गर्दीतला’, ‘भूमितीचा फार्स’, ‘क आणि म’ यांसारख्या विविध नाटकोंमधून काकांचा सहवास लाभला. तेव्हा नाटक  करण्यास पुरेसे पैसे नसायचे तरीही त्यांनी ही नाटय़चळवळ अविरत सुरू ठेवली. आविष्कारमध्ये केवळ नाटक घडवले नाही तर नाटकांची वैचारिक चर्चा तिथे व्हायची. त्यामुळे अनेक नवोदित कलाकारांसाठी काका म्हणजे नाटकाचे प्रशिक्षण केंद्र होते. प्रायोगिक नाटकांसाठी मुंबईत वेगळी जागा असावी याबद्दल काका शेवटपर्यंत आग्रही होते. प्रायोगिक रंगभूमीतील त्यांचे योगदान निश्चित वाखाणण्याजोगे आहे.

– शफाअत खान, लेखक आणि नाटय़दिग्दर्शक

रंगभूमी जगलेली व्यक्तिरेखा..

मला अभिमानाने सांगावसं वाटतं की आजही मी ‘आविष्कार’चा एक भाग आहे. मी मुंबईत आल्यापासून ‘आविष्कार’ आणि अरुण काकडेंशी जोडले गेले आहे. सुरवातीच्या काळात त्यांनी अनेक संकटांचा सामना क रत आविष्कार संस्था उभी केली. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची ऊ र्जा आणि उत्साह कमी झाला नाही. काकडेंविषयी सांगायचे तर उतारकाळातही प्रकृतीपेक्षा त्यांना प्रयोगांचीच काळजी अधिक असायची. डॉक्टरांनी आरामाची सक्ती सांगितलेली असतानाही ते ‘आविष्कार’च्या कार्यलयात जाऊ न बसायचे. वयाच्या ८५व्या वर्षांनंतरही ते तरुण मुलांना प्रोत्साहन देत त्यांच्या सोबत प्रयोगाला जात असे. नवीन विषय रंगभूमीवर आणण्यासाठी सतत ते प्रयत्नशील असायचे. रंगभूमी जगणारी अशी व्यक्ती मी आजवर पहिली नाही.

रोहिणी हट्टंगडी (ज्येष्ठ अभिनेत्री)

रंगकर्मीच्या अनेक पिढय़ांचे शिल्पकार

काकांचा लाभलेला सहवास आणि मिळालेले मार्गदर्शन ही प्रत्येकासाठीच आयुष्यभराची शिदोरी आहे. साधारण साठ वर्षांहून अधिक काळ ते नाटक घडवत राहिले. काही दिवसांपूर्वी काकांच्या प्रकृतीची चौकशी करावी म्हणून त्यांना भेटायला गेलो. तेव्हाही ‘चंदू, नाशिकच्या प्रयोगाची तयारी झाली का?’ असेच त्यांनी विचारले. वयाच्या ८९ व्या वर्षी प्रकृती गंभीर असतानाही जर ते प्रयोगाचाच विचार करत असतील तर यावरूनच त्यांचे आणि रंगभूमीचे नाते स्पष्ट होते. रंगकर्मीच्या पाच पिढय़ा घडवूनही तसूभर अहंकार त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसला नाही. त्यांनी मायेने जवळ के लेले अनेक कलाकार आजही त्याच आपुलकीने आविष्करशी जोडलेले आहेत. अजून दोन वर्षांनी आविष्कारला ५० वर्ष पूर्ण होतील. ‘आविष्कार’च्या सुवर्ण महोत्सवाच्या अनेक कल्पना त्यांच्या डोक्यात होत्या.

चंद्रकांत कु लकर्णी (दिग्दर्शक)