समाजकंटकांकडून साहित्यांची मोडतोड; अडीचशे एकरचा परिसर सीसीटीव्हीविना

नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : गेले सहा महिने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा वावर नसल्याने मुंबई विद्यापीठाचे कलिना येथील संकुल चोर आणि घुसखोरांचा अड्डा बनत चालले आहे. वाढलेले गवत, अपुरी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्हींचा अभाव यांमुळे विद्यापीठाचा परिसर चोरांचे आश्रयस्थान बनत चालले आहे. चोर-गर्दुल्ल्यांच्या वावरामुळे येथे विविध कार्यालयांत चोरीच्या, मोडतोडीच्या घटना घडल्याची माहिती शिक्षक आणि कर्मचारी देतात.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा वावर नाही. शिवाय नियमाप्रमाणे २५ टक्के च कर्मचारी हजर होत आहेत. याचा फायदा घेत घुसखोर विद्यापीठात शिरतात. एवढेच नाही तर कार्यालयांची मोडतोड करणे, मोकळ्या जागी पडलेल्या सामानाची चोरी ते अगदी निवासी शिक्षकांच्या सायकली उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. ऑगस्ट महिन्यात सांस्कृतिक भवन येथील शिक्षकांच्या कार्यालयाची मोडतोड केली. शिवाय स्वच्छतागृहे, दरवाजे, जिने यांचेही नुकसान करण्यात आले. लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या कार्यालयात घुसून अज्ञातांनी कपाट फोडूनत्यातले पैसे लंपास केले आणि कागदपत्रांची नासधूस केली. हाच प्रकार काही दिवसांपूर्वी जैवविज्ञान विभागातही घडला. १८ सप्टेंबरला भर दुपारी पत्रकारिता विभागाच्या प्राध्यापिका दैवता पाटील यांच्या दोन सायकली विद्यापीठ शिक्षक निवासातून चोरीला गेल्या. या घटना वारंवार घडत असल्याच्या तक्रारी विद्यापीठ आवारात राहणारे निवासी शिक्षक करतात. विद्यापीठ संकु लाची देखभाल करण्यासाठी फारसे कर्मचारी नसल्याने येथे मोठय़ा प्रमाणात गवत वाढले आहे. रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्थाही नसते. शिवाय सीसीटीव्ही नसल्याने कोण येते-कोण जाते यावरही विद्यापीठाचे नियंत्रण राहिलेले नाही. ‘चोरी करून गवतांच्या आड सहज लपता येईल एवढे गवत वाढले आहे. रात्री विद्यापीठात चालत निघालो तर कुणीही सहज हल्ला करेल इतका अंधार असतो,’ अशी भीती शिक्षकांनी व्यक्त केली. ‘विद्यापीठ आवारात पडून असलेले सामानही चोरीला जाते. सांस्कृतिक भवनातील वातानुकूलित यंत्र, विविध ठिकाणी पडलेले लोखंडी सामान रातोरात गायब झाले. काही ठिकाणी भिंतींचे काम अर्धवट असल्याने चोरांना सहज प्रवेश मिळवता येतो,’ असे माजी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले.

सीसीटीव्हींची वानवा

दोन वर्षांपूर्वी विद्यापीठ परिसरात ३०० सीसीटीव्ही लावण्याचे मंजूर केले होते. पण त्यातले निम्मेही अद्याप लागलेले नाहीत. अशा घटना वारंवार घडत असतानाही विद्यापीठ प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. या संदर्भात प्रभारी कुलसचिव विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

सांस्कृतिक भवनाची इमारत संकुलाच्या एका बाजूला असून येथे मूलभूत सुविधांचाच अभाव आहे. लोककला अकादमीत विविध वाद्ये, वाङ्मय आहे. त्या साहित्याला धक्का लागला तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. याकडे विद्यापीठाने गांभीर्याने पाहावे. 

– डॉ. गणेश चंदनशिवे. प्रमुख, लोककला अकादमी