आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी प्रत्येकालाच असते. पण, दोन मुली असलेल्या त्या तरुणाच्या हाती काहीच काम नसल्याने हताशा आली होती. सुरक्षा रक्षकाचे काम सुटल्यानंतर काम मिळविण्याचा अनेक ठिकाणी त्याने प्रयत्न केला. घर चालविण्यासाठी पत्नीने घरकाम करण्यास सुरुवात केली. मात्र घर खर्च भागत नव्हता, उधारी वाढत चालली होती. तर दुसरीकडे बेकार असल्याने त्याच्याही डोक्यात तऱ्हेतऱ्हेचे विचार येत होते. अखेर, मंगळवारी त्याने निर्धार केला, रस्त्याने चालतानाच समोरून येणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने त्याला रंगेहाथ पकडले. बिकट परिस्थितीशी लढण्यासाठी घरकाम करणाऱ्या पत्नीने हे ऐकल्यानंतर तिने त्याला भेटण्यासही नकार दिला.

विक्रोळीच्या वर्षांनगर येथे राहणारा विनोद मनतोडे (३० वर्षे) पत्नी आणि दोन मुलींसह राहतो. झोपडीवजा घरात राहणाऱ्या विनोदने घर चालविण्यासाठी अनेक ठिकाणी नोकरी केली. काही महिन्यांपूर्वी घाटकोपरमधल्या एका मॉलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या विनोदचे काम सुटले आणि त्याच्या संसाराची घरघर सुरू झाली. नवऱ्याच्या हाताला काम नसल्याने विनोदच्या पत्नीने परिसरात घरकाम करण्याचे काम हाती घेतले. काही झाले तरी आपल्या दोन चिमुकल्या मुलींना शिकवून मोठे करायचे हा निर्धार दोघांचाही होता, मात्र विनोदचा धीर सुटत चालला होता.

देणेकऱ्यांची बोलणी रोज खावी लागत होती. पण, आज ना उद्या हाताला काम लागेल असा विश्वास विनोदची पत्नी त्याला देत होती. परंतु, मनात विपरीत विचार येत होते. त्यातच मंगळवारी दुपारी काम शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या विनोदला समोरून महिला येताना दिसली. सोनसाखळी चोरली तर किमान २५-३० हजार रुपयांची तजवीज होईल असा विचार त्याच्या मनात चमकला आणि त्याने महिलेच्या गळ्यातील साखळी चोरून जीवाच्या आकांताने पळ काढला. महिलेने आरडाओरडा केला. त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पार्क साइट पोलीस ठाण्याचे हवालदार बनसोडे यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले. एकीकडे उधारी वाढत चालली असताना, मुलींच्या शिक्षणाचे कसे होणार याचा विचार मनात घोळू लागला होता, त्यामुळेच हे टोकाचे पाऊल उचलल्याने विनोदने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी हा प्रकार त्याच्या पत्नीला सांगितल्यानंतर तिने विनोदला भेटण्यास नकार दिला. मेहनत करून घर उभारण्याचे स्वप्न पाहत असताना, चोरी करणाऱ्या पतीला भेटण्याची इच्छा नाही, असे तिने पोलिसांना सांगितले. विनोदची रवानगी न्यायालयाने पोलीस कोठडीत केली आहे.