अभूतपुर्व सुरक्षा व्यवस्थेत विधानभवनात नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सुरू असला तरी या सोहळ्यादरम्यान दोन जणांचे पाकीट मारण्याच्या घटना घडल्या आहेत. एकाचे पाकीट मारताना या चोराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मात्र पुण्याहून आलेल्या एका कार्यकर्त्यांनेही पाकीट मारल्याची तक्रार केली. त्या पाकिटात २ लाख रुपये असल्याचे सांगितले आहे.   विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यासाठी ७०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. तर सुमारे ५ हजार व्यक्ती या सोहळ्यास उपस्थित होत्या.  सोहळ्यासाठी आलेल्यांना एकूण सात प्रकारच्या प्रवेशपत्रिका देण्यात आल्या होता. शपथविधी सोहळा सुरू असताना गोविंद पाटील यांचे पाकीट मारताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. पाटील यांच्या पाकिटात सहा हजार रुपये होते.  त्याच वेळी चाकणहून आलेल्या अन्य एका कार्यकर्त्यांने आपले पाकीट मारल्याचे सांगितले. मी चाकणहून थेट सोहळ्यास आलो आणि माझ्या पाकिटात २ लाख रुपये होते असे त्याने पोलिसांना सांगितले. आम्ही या दोन्ही तक्रारींबाबत गुन्हा नोंदवून घेतला आहे. आरोपीने पिवळा पास मिळवून विधानभवनात प्रवेश मिळवला होता, असे परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले.