राज्यात भूजलाची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने विविध भागांमध्ये पाण्याचे दुर्भक्ष निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भूजल चोरीची गंभीर घटना उघड झाली आहे. ही सर्वसाधारण घटना वाटत असली तरी यामध्ये सुमारे ७३ कोटी रुपयांचे पाणी चोरण्यात आल्याने गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एएनआयने यासंदर्भात ट्विट केले आहे.

काळबादेवी बोमनजी मास्टर लेनमध्ये असलेल्या पांड्या मेंशनचे मालक व इतरांवर आरोप आहे की, त्यांनी गेल्या ११ वर्षांपासून पाण्याच्या टॅंकरवाल्यांसोबत सुमारे ७३ कोटी रुपयांचे पाणी चोरले आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे. भादंवि कलम ३७९ आणि कलम ३४ अंतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर उजालाने याबाबत वृत्त दिले आहे.

एफआयआरमध्ये पांड्या मेंशनचे मालक त्रिपुराप्रसाद नानलाल पांड्या आणि त्यांच्या कंपनीचे दोन संचालक प्रकाश पांड्या आणि मनोज पांड्या यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी आपल्या जागेत परवानगी न घेता अवैधरित्या विहिरी खोदल्या होत्या. २००६ ते २०१७ पर्यंत या आरोपींनी ७३.१९ कोटी रुपयांच्या जमिनीखालील पाणी विकले आहे. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाने या विहिरी कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.