मुलुंडमधील वेटरसह तिघांना अटक; ६४ ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपये लंपास

उपाहारगृहात बिल अदा करण्यासाठी देण्यात आलेल्या डेबिट कार्डचे ‘स्कीमर’च्या साह्याने क्लोनिंग करून त्याआधारे ग्राहकाच्या खात्यातील पैसे लंपास करण्यात आल्याचा प्रकार मुलुंडमध्ये उघडकीस आला आहे. उपाहारगृहात काम करणाऱ्या वेटरसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी आतापर्यंत ६४ ग्राहकांच्या बँक खात्यातून लूट केल्याचे उघड झाले आहे. उपाहारगृह किंवा बार अशा ठिकाणी अनेक जण रोकडऐवजी कार्डद्वारे बिल चुकते करतात. याचाच गैरफायदा घेत मुलुंडमधील एका हॉटेलात काम करणाऱ्या वेटरने ग्राहकांच्या डेबिट कार्डाचा तपशील चोरला. या माहितीच्या आधारे त्याने या कार्डाशी संलग्न बँक खात्यातून लाखो रुपये लंपास केले. या गैरकृत्याचा उलगडा सुमारे महिनाभरापूर्वी झाला.

महिनाभरापूर्वी मुलुंड येथे राहणाऱ्या एका नागरिकाला आपल्या बँक खात्यातून अचानक २४ हजार रुपये काढले गेल्याचे लक्षात आले. त्याने याबाबत बँकेकडे चौकशी केली असता, कर्नाटक येथील एका एटीएममधून पैसे काढल्याचे बँकेने त्याला कळवले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने या नागरिकाने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनीही बँकेकडे चौकशी केली असता अशा प्रकारे ६४ ग्राहकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झाल्याचे बँकेने सांगितले.

पोलिसांनी तत्काळ पैसे गायब झालेल्या ग्राहकांसोबत संपर्क साधत त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यांनी मुंबईतील सुनील हॉटेल प्रा. लि., अपना धाबा, अर्बन तडका, रेन फॉरेस्ट या काही हॉटेलांमध्ये त्यांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या हॉटेलांमध्ये तपास केला असता, धनेश ऊर्फ सुरेश टंडन नावाच्या इसमाने या सर्व हॉटेलमध्ये काही दिवसांकरिता काम केल्याचे चौकशीत लक्षात आले. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या बिलाचे पैसे भरण्यासाठी हाच आरोपी ग्राहकांचे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड हाताळत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अथक प्रयत्नांनंतर झारखंड येथून त्याला अटक करण्यात आली.

‘स्कीमर’द्वारे माहितीची चोरी

हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या एटीएम कार्डची माहिती स्कीमर मशीनद्वारे चोरून त्यांचे पिन क्रमांक एका कागदावर लिहून वेटर सुरेश टंडन ती माहिती बेळगाव येथे राहणाऱ्या तुकाराम गुडाजी ऊर्फ विजय रेड्डी यास देत असे. त्यानंतर रेड्डी बनावट डेबिट कार्ड तयार करून संबंधित खात्यांमधून पैसे काढत असे. टंडन याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बेळगावमधून रेड्डी याला अटक केली. या आरोपींनी अशाच प्रकारे शेकडो जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून साडेसात लाख रुपये रोख आणि आठ भ्रमणध्वनी असा ऐवज हस्तगत केला आहे.