News Flash

..तर रुग्णालयांतील सेवा विस्कळीत होईल!

एकदा पॉवर ग्रिड बंद झाल्यास त्याला पुन्हा कार्यान्वित करायला १२ ते १६ तास लागतात.

संग्रहित छायाचित्र

करोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश उद्योग आणि व्यावसायिक आस्थापने बंद आहेत. त्यामुळे राज्यातील विजेची मागणी कमी झाली आहे. विजेचा भार कमी झाल्याने महानिर्मितीला कोळशावर आधारित प्रकल्पातून ३ हजार ४० मेगावॉटचे उत्पादन घ्यावे लागत आहे.

मागणीअभावी महानिर्मितीला त्यांचे अनेक संच बंद किंवा किमान पातळीवर सुरू ठेवावे लागले आहेत. दुसरीकडे करोनाच्या सावटात राज्यातील सर्व रुग्णालयांत व्हेंटिलेटरसह इतर यंत्रासाठी योग्य दाबाने वीज देण्याचे आव्हान महावितरणपुढे आहे. त्यात सर्वानी अचानक दिवे बंद केले तर ग्रिड कोसळण्याचा व त्यातून महाराष्ट्रासह देशही अंधारात जाण्याचा धोका आहे. शिवाय रुग्णालयांसह इतर वैद्यकीय तपासणी व सेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे. एकदा पॉवर ग्रिड बंद झाल्यास त्याला पुन्हा कार्यान्वित करायला १२ ते १६ तास लागतात. तर वीज स्थिती सामान्य व्हायला सुमारे आठवडा लागेल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिला.

दिवे, पंखे बंद करू नका -डॉ. राऊत

घरांतील विजेचे दिवे नऊ मिनिटे बंद करून मेणबत्ती किंवा पणत्या, टॉर्च लावण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन म्हणजे शुद्ध बालिशपणा आहे. एकाच वेळी सगळ्यांनी दिवे व पंखे बंद केल्यास ग्रिडची फ्रीक्वेन्सी वाढून ते ठप्प होण्याचा व त्यातून देशातील वीजनिर्मिती के ंद्रे बंद पडण्याचा धोका आहे. तसे झाल्यास मोठे नुकसान होईल. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी कित्येक तास लागतील. यामुळे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे जीवित धोक्यात येईल. त्याची पंतप्रधानांना चिंता नसून केवळ इव्हेंट करण्यासाठी देशाची सुरक्षा धोक्यात घातली जात आहे. सध्या टाळेबंदीमुळे विजेच्या मागणीत घट झाल्याने ग्रिडमध्ये उच्चदाब असल्याने जर मागणीत पुन्हा घट झाली तर पॉवर ग्रिड कोसळू शकते. यामुळे करोनासह अजून नवीन वेगळे संकट उभे होईल. हा प्रकार म्हणजे एक एप्रिलऐवजी पंतप्रधानांनी ५ एप्रिलला देशाला एप्रिल फुल बनवण्यासारखे आहे. नागरिकांनी करोना रुग्णांसह इतरांच्या वीज यंत्रणेला धोका निर्माण होऊ नये म्हणून स्वतच्या घरचे दिवे, पंखे बंद करू नयेत, असे मत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.

दिवे बंद केल्यास पंखे मुद्दाम सुरू करा -अशोक पेंडसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री नऊ वाजता दिवे बंद करायचे की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, दिवे बंद करायचे असल्यास घरातील पंखे आदी विजेची उपकरणे मुद्दाम सुरू करावीत. त्यातून विजेच्या मागणीचे व विजेच्या ग्रिडचे संतुलन कायम ठेवण्यास मदत होऊ शकेल, असे आवाहन वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी केले.

उत्तर प्रदेशची भारनियमनाची तयारी

उत्तर प्रदेशमध्ये या नऊ मिनिटांच्या काळात तीन हजार मेगावॉटने वीजमागणी अकस्मात कमी होईल असा अंदाज तेथील भार प्रेषण के ंद्राने व्यक्त के ला आहे. त्याचबरोबर या परिस्थितीत ग्रिड सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यात रात्री आठ ते नऊ कालावधीत ठिकठिकाणी भारनियमन करून ग्रिडला वाचवण्याची तयारी ठेवली आहे. तासभर आधीच भारनियमन सुरू झाल्याने अचानक वीजमागणी कमी होऊन ग्रिडला झटका बसणार नाही, संतुलन राखता येईल, असा त्यामागील उद्देश आहे.

नागरिकांनी एकाच वेळी घरातील वीज बंद केल्यास तांत्रिक समस्या निर्माण होऊन यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता निश्चितच आहे. एखाद्या रस्त्यावरील वाहतूक बंद करून नंतर एकदमच सोडल्यास जे होते, तशीच परिस्थिती ही विजेच्या बाबतीत निर्माण होऊ शकते. एखादा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद पडल्यास त्याला पूर्ववत करण्यास आठवडय़ाचा कालावधी जातो. यापूर्वी २००३ मध्ये असे घडले होते. तेव्हा १४ तास राज्य अंधारात गेले होते. मागणी एकदम प्रचंड कमी झाल्यास वरिष्ठ यंत्रणेपासून खालपर्यंत त्याचे नियोजन आवश्यक ठरते, पण ही बाब अत्यंत किचकट आहे. एखाद्या खोलीतील दिवा बंद करणे ठीक, पण सर्वच घरातील वीज बंद करणे योग्य नाही.

– अभिजित परांजपे, विद्युत अभियंता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:47 am

Web Title: then hospital services will be disrupted abn 97
Next Stories
1 स्थलांतरित मजूर अजूनही वाऱ्यावर
2 मुंबईतील आणखी चार करोनाग्रस्तांचा मृत्यू
3 शहरातील ५ रुग्णालये ‘करोना समर्पित’
Just Now!
X