मराठी मानसिकतेला हळुवार परंतु बोचरे चिमटे काढत, सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीवर आपल्या खुमासदार शैलीत नेमके काव्यात्म भाष्य करत रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकर या प्रसिद्ध हास्यकवींनी मंगळवारी ‘लोकसत्ता’च्या ७१ व्या वर्धापनदिन सोहळ्याची संध्याकाळ खुसखुशीत केली. नायगावकरांच्या विनोदाचा नायगारा आणि रामदास फुटाणेंची फोडणी असा दुहेरी हास्ययोग विविध क्षेत्रांतील नामवंतांनी अनुभवला. काही वर्षांनी आपल्याला मराठी शिकण्यासाठी अमेरिकेत जावे लागेल, अशा भेदक वास्तवाची जाणीवही फुटाणे यांनी यावेळी करून दिली.

‘लोकसत्ता’चा वर्धापनदिन आणि त्यानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या वर्षवेध या वार्षिकांकाच्या प्रकाशन सोहळ्यात नायगावकर आणि फुटाणे यांच्या हास्यकवितांनी गेल्या जवळपास तीन दशकांतील राजकीय व सामाजिक स्थितीचे वर्तमानाशी मिळतेजुळते चित्र उभे केले, आणि नरिमन पॉइंटच्या परिसरातील राजकारणाला सरावलेला संध्याकाळचा वाराही एक्स्प्रेस टॉवरच्या हिरवळीभोवती मंद होऊन सोहळ्याची मौज अनुभवू लागला. कान्होपात्राला क्लिओपात्रा करणारी इकॉनॉमी गेल्या काही वर्षांत देशात सुरू झाली आहे, असा भेदक टोला मारत फुटाणे यांनी राजकीय कोपरखळीची पहिली चुणूक दाखविली. देशात अर्थतज्ज्ञांची संख्या वाढत चालली, तसतशी अर्थव्यवस्था बिघडत चालली, असे सांगताना, राजकारणाचा एक पदरही त्यांनी उलगडला. ज्यांनी श्रेष्ठींच्या पायांवर निष्ठा वाहिल्या, त्यांना प्रतिष्ठा मिळाली असे सांगत, १९८२ नंतर अनेकवार खेळाडू बदलले तरी खेळ तोच आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. आपल्या कवितांमुळे अमेरिकेतही मराठी माणसं चांगभलं म्हणून संध्याकाळ साजरी करू लागली आहेत, अशा मिश्किल शब्दांत मराठीच्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत, काही वर्षांनी मराठी शिकण्यासाठी आपल्याला अमेरिकेत जावे लागेल, अशा भेदक शब्दांत त्यांनी वास्तवाची जाणीवही करून दिली.

नायगांवकर यांच्या कविता ही मिश्किली असते, असे सांगत फुटाणे यांनी नायगावकरांच्या हाती माईक दिला, आणि हास्यकवितांचा  नायगारा जिवंत झाला. मराठी माणूस हा नायगावकरांच्या बऱ्याचशा हास्यकवितांचा केंद्रबिंदू! आपल्या कवितांमधून ते मराठी माणसाच्या मानसिकतेवर नेमके बोट ठेवतात. तिळगुळ देताना मारामारी झाली, गोड बोलायला कुणाला शिकवता? अशा भेदक विरोधाभासातून नायगावकरांनी केलेली विदारक विनोदनिर्मिती हा आजच्या संध्याकाळचा उत्कर्षबिंदू ठरला. अच्छे दिन आनेवाले है असा एसएमएस सकाळी येतो, आणि पाठोपाठ, अफवांवर विश्वास ठेवू नका असा आयुक्तांचा एसएमएस येतो, असे सांगताना, नायगांवकरांच्या चेहऱ्यावरील विनोदाची रेषा न रेषा फुलली होती, आणि श्रोत्यांच्या चेहऱ्यावरही त्याचे प्रतिबिंब उमटले होते. पुढे कवितेच्या प्रत्येक ओळीनजिक कार्यक्रम बहारदार होत गेला. चौपाटीवरच्या टिळकांच्या पुतळ्यास उद्देशून केलेली नायगांवकरांची ती कविता श्रोत्यांना अंतर्मुख करून गेली. डान्सबारवरील बंदी शिथिल केल्याबाबत खुसखुशीत भाष्य करताना, आमच्या सोसायटीतील प्रत्येकाने बारबालेस दत्तक घ्यायचा ठराव केला, असा टोला त्यांनी मारला.

ज्यांच्या अफवा जोरात असतात, ते निवडून येतात असे काल मला एका ज्योतिषाने सांगितले, असे ते म्हणाले, आणि हास्याच्या कल्लोळात कार्यक्रम अधकिच उंचीवर जाऊन पोहोचला. मुख्यमंत्र्यांनी ‘लोकसत्ता’च्या वतीने नायगावकर-फुटाणे या हास्यकवींचा सत्कार करताना, हा कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते, अशा मोजक्या शब्दांत हास्यकवितांची स्तुती केली.