25 November 2017

News Flash

.. तर आम्हीही राजकारणात नसतो

कसलीही राजकीय पाश्र्वभूमी नाही, कुणी गॉडफादर नाही, अशा परिस्थितीत आज आम्ही जे काही राजकारणात

खास प्रतिनिधी, मुंबई | Updated: November 27, 2012 4:01 AM

कसलीही राजकीय पाश्र्वभूमी नाही, कुणी गॉडफादर नाही, अशा परिस्थितीत आज आम्ही जे काही राजकारणात उभे आहोत, ते केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे, हा भूतकाळ कधीही विसरता येणार नाही, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व उद्योग मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने सोमवारी मंत्रालयात आयोजित शोकसभेत एकेकाळचे कडवे शिवसैनिक असलेले छगन भुजबळ व नारायण राणे हेही उपस्थित होते. शिवसेनेतील त्या भारावलेल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना नारायण राणे कमालीचे भावुक झाले. बाळासाहेबांनी आपल्याला सत्ता दिली, पदे दिली तसेच प्रेमही दिले. शिवसेना नसती तर नारायण राणेही नसता, अशा शब्दात त्यांनी बाळासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपण मुख्यमंत्री कसे झालो याचा किस्साही राणे यांनी ऐकवला. राजीनामा देऊन भेटायला या, असे बाळासाहेबांनी मनोहर जोशींना सांगितले. जोशी राजीनामा द्यायला राजभवनात गेले. दरम्यान बाळासाहेबांनी आमदारांची बैठक बोलावली, आणि ‘मनोहर जोशींनी राजीनामा दिला आहे ते आता इथे येतील’ असे सांगून ते निघून गेले. नंतर काही वेळातच, ‘नारायण राणेंचे नाव जाहीर करा’ असे बाळासाहेबांनी सांगितले आणि मी मुख्यमंत्री झालो. बाळासाहेबच असा मुख्यमंत्री करु शकतात, दुसरे कुणीही नाही, यावर राणे यांनी विशेष जोर दिला. अर्थात शिवसेना माझा भूतकाळ होता आणि कॉंग्रेस माझा भविष्यकाळ आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. छगन भुजबळ यांनीही बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कसलीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना आज आम्ही राजकारणात उभे आहोत, ते फक्त शिवेसना व बाळासाहेबांमुळेच हे सांगायला मला कसलीही भीती वाटत नाही, असे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या आठवणी सांगताना, मनोहरपंत आपल्याला कसे फसवत होते याचाही किस्सा भुजबळ यांनी ऐकविला.
आपण मुंबईच्या बाहेर असताना ‘गरवारे क्लबच्या अध्यक्षपदाची निवडणूक तुम्ही लढवायची आहे’, असे मला मनोहरपंतांनी सांगितले. मी मुंबईत आलो, निवडणुकीचा अर्ज भरला आणि मनोहर जोशींना शोधायला लागलो तर पंत गायब. बाळासाहेबांना हा प्रकार मी सांगितला, ते मनोहरपंतांवर प्रचंड चिडले. पण त्याचबरोबर त्यांनी स्वत क्लबच्या काही सदस्यांना फोन करुन मला मतदान करायला सांगितले.
माझी लढत शरद पवारांशी होती. त्यांच्या पॅनेलमध्ये मनोहर जोशींचे नाव बघून मला धक्काच बसला. ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र व संघाच्या इतर पदाधिकाऱ्यांची बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करणारी भाषणे झाली. 

First Published on November 27, 2012 4:01 am

Web Title: then we might be not in politics