करोनचा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकास शक्य तितक्या डिजिटल बँकिंग सुविधेचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्याबाबत अधिसूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजीटल बँकिंग सुविधेचा गैरवापर करून जनतेची फसवणूक करत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सायबर पोलीस ठाणे, मुंबई यांनी या तक्रारींचे विश्लेषण केले असता असे निदर्शनास आले आहे की, सायबर गुन्हेगारांनी सायबर गुन्हे करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांसाठी काही सूचना केल्या आहेत. या सुचनां लक्षात ठेवल्या नाहीतर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात नागरिक नक्की अडकण्याची दाट शक्यता आहे.

सद्यस्थितीस विविध बँकांनी त्यांच्या ग्राहकांना त्यांचे कर्ज खात्याशी संबंधित ईएमआय पुढे ढकण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली असून याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार बँक अधिकरी, कर्मचारी बोलत असल्याचे भासवून  बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती जसे की, पिन, सीसीव्ही, ओटीपी इत्यादी माहिती प्राप्त करून घेवून फसवणूक करत आहेत.

तसेच, सायबर गुन्हेगार ग्राहकांना बँकेच्या नावे एसएमएस पाठवून त्याद्वारे AnyDesk, Quick Support, Team Viewer,Airdriod इत्यादी सारखे वेगवेगळे स्क्रिन शेअरिंग अ‍ॅप्स डाउनलोड करण्यास भाग पाडून त्यांचे मोबाईल व संगणकाचा अनधिकृत ताबा घेवून  फसवणूक करत आहेत.

बँकेचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून ग्राहकांकडुन त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती व त्यांचे मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी नंबर देण्यास भाग पाडून  किंवा त्यांना एखादे अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगुन त्याद्वारे बँक खात्याची माहिती व ओटीपी नंबर प्राप्त करून ग्राहकांच्या बँक खात्यातुन रक्कम काढून फसवणुक केली जाते.

या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांचे कर्ज खात्याशी संबंधित ईएमआय पुढे ढकलण्यासाठी बँकेकडून एसएमएस प्राप्त झाल्यास किंवा बँकेचा अधिकारी, कर्मचारी बोलत असल्याचे सांगून बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मागितल्यासन देवू नये किंवा समोरील व्यक्तीने सांगितल्यानुसार कोणतेही अ‍ॅप्लिकेशन मोबाइलमध्ये डाउनलोड करू नये.