‘थिओडोलाइट’सह अनेक दुर्मीळ यंत्रांचे नेहरू विज्ञान केंद्रात प्रदर्शन

हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या अखंड भारताच्या भूखंडाच्या मोजणीचे काम पहिल्यांदा १८०२ साली सुरू झाले. भारतीय सर्वेक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या या ऐतिहासिक सर्वेक्षणाचा साक्षीदार असलेले ‘थिओडोलाइट’ नावाचे यंत्र नेहरू विज्ञान केंद्र येथे प्रदर्शनामध्ये पाहण्यास मिळणार आहे. थोर भारतीय शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकाचे मानकरी सी. व्ही. रामन व वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या दुर्मीळ आणि ऐतिहासिक यंत्रांचे प्रदर्शन राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने ११ ते १३ मे या काळात नेहरू विज्ञान केंद्र येथे भरविण्यात येणार आहे.

ब्रिटिश तंत्रज्ञ विल्यम लॅम्बटन यांच्या नेतृत्वाखाली त्रिकोणमितीय पद्धतीने भारताच्या सर्वेक्षणाची सुरुवात केली गेली. लॅम्बटन यांच्यानंतर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी या सर्वेक्षणाची जबाबदारी पूर्ण केली. त्यांच्याच नावाने नंतर शिखराला ‘एव्हरेस्ट’ असे नाव दिले. या सर्वेक्षणामध्ये मोजणी आणि मापनासाठी थिओडिलाइट या यंत्राचा वापर केला गेला. सुमारे ४६५ किलो वजनाचे हे यंत्र आजही हैदराबाद येथील भारताच्या सर्वेक्षण विभागाने जतन करून ठेवले आहे. लंडन येथे नुकत्याच झालेल्या प्रदर्शनामध्ये हे यंत्र मांडण्यात आले होते. हैदराबाद येथे पुन्हा हे यंत्र परत पाठवणार असून त्या आधी ते मुंबईकरांसाठी प्र्दशनामध्ये पाहता येणार आहे.

प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिकाचे मानकरी सी. व्ही. रामन यांचे प्रकाशाच्या विकिरणासंदर्भात संशोधन ‘रामन इफेक्ट’ नावाने अजरामर आहे. या संशोधनाच्या काळात वापरलेले ‘स्पेक्ट्रोस्कोप’ यंत्रही या प्रदर्शनामध्ये पाहण्यास मिळणार आहे. वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांनी ज्या यंत्रांच्या साहाय्याने वनस्पतींचा अभ्यास केला, ती यंत्रेही या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे. दुर्मीळ अशा या यंत्रांचे मुंबईमध्ये प्रथमच प्रदर्शन भरविले जाणार आहे.

मुंबईतील भुयारी मेट्रोनिर्मितीचे प्रदर्शन

मुंबईच्या भूगर्भात चालविण्यात येणारी मुंबई मेट्रो – ३ कशी आकारास येणार आहे, याचे तंत्रज्ञानासह विश्लेषण करणारे प्रदर्शनही नेहरू विज्ञान केंद्र येथे भरविले जाणार आहे. भुयारी रेल्वे कशी बांधली जाते, त्यासाठी लागणारा भुयारी मार्ग कसा खोदला जातो याची विस्तृत माहिती या प्रदर्शनामध्ये देण्यात येणार आहे. भुयार खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीचे छोटेखानी प्रतिरूपही या प्रदर्शनामध्ये मांडण्यात येणार आहे. तसेच प्रदर्शनामध्ये लावण्यात येणाऱ्या स्क्रीनच्या माध्यमातून प्रत्यक्ष बांधकाम कसे केले जाते, याचे व्हिडीओ आणि फोटोसह विश्लेषण केले जाणार आहे.