हिट अॅण्ड रन प्रकरणात अभिनेता सलमान खान याचे रक्ताचे नमुने योग्य पद्धतीने तपासण्यात आले नसून, त्यामध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा सलमान खानचे वकील अॅड. अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात केला. कलिनामधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात ‘अल्कोहोल’ हा शब्द नंतर वापरण्यात आला, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्याचबरोबर रक्ताचे नमुने सलमान खानचेच आहेत, असे खात्रीशीरपणे सांगता येणार नाही, असेही वकिलांनी म्हटले आहे.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याला सत्र न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निकालाविरोधात सलमान खानने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सध्या न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठात सुनावणी सुरू आहे.
सुनावणीवेळी केलेल्या युक्तिवादात अमित देसाई म्हणाले, घटना घडल्यानंतर जे जे रुग्णालयात ज्यावेळी सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यावेळी तिथे कोणालाही साक्षीदार म्हणून नेमण्यात आले नव्हते. त्याचबरोबर कलिना न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात ‘अल्कोहोल’ हा शब्द नंतर वापरण्यात आला. ही घटना घडल्यानंतर सलमान खानसोबत वांद्रे पोलीस ठाण्यात, जे जे रुग्णालयात जे काही घडले, त्यामध्ये अनेक गैरप्रकार झाले आहेत. त्यामुळे कलिना न्यायवैद्यक प्रयोगशाळेला दिलेले रक्ताचे नमुने सलमान खानचेच आहेत, असे खात्रीलायकपणे सांगता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
रक्ताचे नमुने योग्य पद्धतीने सीलही करण्यात आले नव्हते. आणि नमुने घेताना सलमान खानकडून संमतीपत्रही घेण्यात आलेले नाही, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.