ब्रिटनमधून देशात परतलेले आणि बाधित असलेल्या ४३ प्रवाशापैकी एकाही रुग्णांमध्ये करोनाचा संकरित विषाणू आढळलेला नाही. मात्र तरीही सतर्कता बाळगण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे

ब्रिटनमधून आलेल्या ३९०० प्रवाशामधून ४३ प्रवासी करोनाबधित आढळले होते. यांचे जनुकीय नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत(एनआयव्ही) पाठविले होते. हे अहवाल आले असून यातील एकालाही संकरित विषाणूचा संसर्ग झाले नसल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी दिली.

देशभरात संकरित विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. ब्रिटन आणि अन्य देशामध्ये या विषाणूमुळे पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे ही वेळ येऊ नये यासाठी लोकांनी करोना प्रतिबंध नियमांचे पालन करत सावधतेने वागण्याची गरज आहे.

यामुळे आरोग्य व्यवस्थेवरही ताण पडणार नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

संपर्कातील २४ जणांना संसर्ग

गुरुवारपर्यत यांच्या सहवासितांमधील ४०५ जणांचा शोध घेतला असून यातील २६६ जणांच्या चाचण्या केल्या गेल्या. यातून २४ जण बाधित असल्याचे आढळले आहे.

ब्रिटनहून आलेल्या बाधितांची संख्या ६४ वर

ब्रिटनहून आत्तापर्यंत राज्यात आलेल्या ४६४९ प्रवाशांचा शोध घेतला आहे. यातील ३१२९ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या असून यात ६४ जण बाधित झाल्याचे आढळले. यात मुंबई (२७), ठाणे (७), पुणे (१२), नागपूर (६), नाशिक, औरंगाबाद आणि बुलढाणा येथे प्रत्येकी दोन, तर नांदेड, रायगड आणि वाशिममध्ये प्रत्येकी एक रुग्णाची नोंद आहे. गुरुवापर्यंत ५८ जणांचे नमुने पाठविले असून अन्य ४ जणांचे नमुने पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी ३१२९ जणांनी २८ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे.