आयडॉलच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांमध्ये मंगळवारी झालेल्या गोंधळानंतर परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ विद्यापीठावर आली. विद्यार्थ्यांना परीक्षांबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशनासाठी आयडॉलकडे सद्य:स्थितीत शिक्षकच नसल्याचे समोर आले आहे. शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत आणि असलेल्या कंत्राटी शिक्षकांना वेतनही मिळालेले नाही.

आयडॉलच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा बोजवारा उडाला. सव्‍‌र्हरवर सायबर हल्ला झाल्याचे कारण विद्यापीठाने पुढे केले. मात्र, त्याचबरोबर आयडॉलच्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करणे, त्यांच्याशी संपर्क करणे अशा गोष्टीही परीक्षेपूर्वी झाल्या नसल्याचे विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मुळात ही कामे करण्यासाठी आयडॉलकडे सध्या शिक्षकच नाहीत.

शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी नॅकची श्रेणी मिळवण्यासाठी काही प्रमाणात कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात आली. मात्र, त्यांनाही विद्यापीठाने गेले चार महिने वेतनच दिले नाही. अनेकांचे कंत्राट संपले आहे, ते अद्ययावत करण्यात आलेले नाही. असे असतानाही या शिक्षकांनी परीक्षांची जबाबदारी उचलण्याची अपेक्षा विद्यापीठ करत असल्याचा आक्षेप शिक्षकांनी घेतला आहे.

आयडॉलच्या शिक्षकांबाबत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही सदस्य वैभव नरवडे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, तरीही विद्यापीठ प्रशासनाने काहीच कार्यवाही केली नसल्याचे नरवडे यांनी सांगितले. याबाबत ‘मुंबई युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन’ (मुक्ता) या संघटनेने तातडीने शिक्षकांच्या पुनर्नियुक्त्या कराव्यात तसेच त्यांचे प्रलंबित वेतनही द्यावे अशी मागणी केली आहे. या शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांच्या नियुक्त्या पूर्ण होतील, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचा तपशील नाही?

परीक्षा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक महाविद्यालयाने त्यांच्या प्राध्यापकांना विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांची माहिती घेण्यास सांगितले होते. विद्यार्थी कुठे आहेत, त्यांच्याकडे काय साधने आहेत, संपर्क क्रमांक, इमेल अशी माहिती महाविद्यालयातील प्राध्यापकांनी गोळा केली. आयडॉलच्या विद्यार्थ्यांबाबत मात्र अशी कोणतीही प्रक्रिया न झाल्याचे समजते आहे. आयडॉलचे विद्यार्थी हे बाहेरून परीक्षा देतात. त्यांनी प्रवेशाच्या वेळी दिलेले संपर्क क्रमांक, इमेल आयडी विद्यापीठाकडे असतो. मात्र, त्यात काही बदल झाला असल्यास तो अद्ययावत केलेला असतोच असे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या लिंक मिळू शकल्या नाहीत.

दोन दिवसांनी तक्रार..

मुंबई विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठाच्या परीक्षा घेणाऱ्या सव्‍‌र्हरवर सायबर हल्ला झाल्यानंतर त्याची तक्रार दाखल करण्यास दोन दिवसांचा कालावधी लागला आहे. आयडॉलच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ज्या सव्‍‌र्हरच्या माध्यमातून घेण्यात आली, त्यात माध्यमातून विभागातील नियमित विद्यार्थ्यांचीही परीक्षा होत आहे. मात्र, तुलनेने विभागातील विद्यार्थ्यांना अडचणी आल्या नाहीत. आयडॉलच्या परीक्षांमधील गोंधळाचा फटका जवळपास २० ते २२ हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे. सव्‍‌र्हरवर सायबर हल्ला झाल्याचे विद्यापीठाने मंगळवारी रात्री जाहीर केले. असे घडले असल्यास विद्यार्थ्यांची माहिती, परीक्षांची माहिती असे सगळेच धोक्यातही येऊ शकते. मात्र, बुधवारी याबाबत सायबर गुन्हे विभागाकडे विद्यापीठाने तक्रार केली नाही. या प्रकाराची तक्रार गुरुवारी सायंकाळी करण्यात आल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.