संदीप आचार्य 
मुंबई: संपूर्ण जगात आपली दहशत निर्माण करणाऱ्या करोनाला रोखण्यासाठी जगभरात संशोधन सुरु असताना करोना ने आपल्या लक्षणांचे रंग बदलायला सुरुवात केल्यामुळे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञही आता करोनाकडे वेगळ्या नजरेने बघू लागली आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब अथवा आरोग्याचा अन्य कोणताही त्रास नसलेल्या व्यक्तींना जेव्हा करोनाची लागण होते तेव्हा यातील काही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण आश्चर्यकारकपणे वाढल्याचे दिसून येत आहे. मधुमेहाचा कोणताही इतिहास नसलेल्या करोना रुग्णांमध्ये मधुमेह दिसत असल्यामुळे डॉक्टरांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी करोना झालेल्या रुग्णांना ताप, कोरडा खोकला, श्वासोच्छ्वासा त्रास आदी लक्षणे दिसत होती. तथापि गेल्या महिनाभरात मधुमेह नसलेल्या करोना रुग्णांमध्ये साखरेचे प्रमाण अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. याबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य व लीलावती रुग्णालयातील विख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांना विचारले असता ते म्हणाले, अलीकडे करोनाच्या लक्षणांचे नवेनवे रंग दिसू लागले आहेत. करोना रुग्णांमध्ये मधुमेहा प्रमाणे आणखीही काही नवीन लक्षणे आढळताना दिसतात. यात सतत ताप येणे, थंडी भरून ताप येणे, गुडघ्याखालील भागात दुखणे, पोटरी दुखणे, पाठदुखीचा त्रास निर्माण होणे अशी काही नवीन लक्षणे दिसत आहेत.

यापूर्वी ताप, कोरडा खोकला व श्वासाचा त्रास ही प्रमुख लक्षणे होती. आता ज्यांना पूर्वी कधी मधुमेहाचा त्रास नव्हता अशा रुग्णांमध्ये मधुमेह आढळून येत आहे. याबाबत अधिक अभ्यास करूनच ठोस निष्कर्षापर्यंत येता येईल. मात्र प्रथमदर्शनी करोनाचा विषाणू हा शरीरातील चार घटकांवर हल्ला करत असतो त्यातील स्वादुपिंड हा एक प्रमुख घटक असून यातूनच मधुमेह नसलेल्यांमध्ये मधुमेह आढळून येत असला पाहिजे, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. करोनाचा विषाणू हा हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड व मूत्रपिंडावर हल्ला करत असून यातून रुग्णानुसार काही परिणाम दिसतात. अर्थात ठोस निष्कर्षापर्यंत येण्यासाठी काही काळ लागेल, मात्र करोना आता आपले लक्षणात्मक रंग बदलू लागला आहे हे नक्की, असेही डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. अनेक करोना रुग्णांना पाठदुखीचा त्रास होत आहे तर पोटरी व गुडघ्याखालील भाग दुखत असलेले अनेक रुग्ण आता आढळून येत आहेत.

“स्वॅब टेस्ट, सिटी स्कॅन, अॅन्टीजेन व अॅन्टीबॉडी चाचण्यांमध्ये काही गोष्टी अधिक प्रमाणात स्पष्ट होतील. काही रुग्णांमध्ये अनेकदा चाचणी केल्यावरही ते करोना पॉझिटिव्ह आढळून येतात. हे लक्षणरहित करोना रुग्णांमध्ये शरीरातील विषणूचा मृत्यू झाला तरी सामान्य भाषेत कळावे म्हणून सांगायचे झाल्यास कचरा बनून हा विषाणू शरीरात राहातो. म्हणूनच अॅन्टीबॉडी चाचणी पॉझिटिव्ह येत राहाते. एका रुग्णामध्ये नव्वद दिवसांपर्यंत करोनाचा विषाणू वास करून राहिल्याचे चाचणीत आढळून आले असून हा जागतिक विक्रम ठरू शकतो”, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. तसेच मधुमेह नसलेल्या ज्या करोना रुग्णांना करोना काळात मधुमेह उद्भवतो त्यांचा मधुमेह बरे झाल्यानंतर नाहीसा होतो, असेही डॉ. जोशी म्हणाले. एक नक्की करोनाच्या लक्षणांनी आपले रंग बदलायला सुरुवात केली असून आगामी काळात करोनाची चाचणी करताना या लक्षणांचाही विचार करावा लागणार आहे.