थॅलेसेमियाग्रस्त बालकांची वणवण सुरू

मुंबई : शहरात पुन्हा रक्ताचा मोठय़ा प्रमाणात तुडवटा निर्माण झाला असून वारंवार रक्ताची गरज भासणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त बालकांची वणवण सुरू झाली आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात महाविद्यालये बंद असल्याने बहुतांश लोक बाहेर फिरायला जात असल्याने तुटवडा जाणवतो. परंतु गेल्या वर्षभरात करोनामुळे मोठी शिबिरे बंद होती. मधल्या काळात विविध सणांच्या निमित्ताने काही ठिकाणी रक्तदान शिबिरे भरवली गेली. परंतु पुन्हा यात मोठा खंड पडला असल्याने मुंबईतील अनेक रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे.

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात केवळ ३० रक्तपिशव्या आहेत. येथे जवळपास ३०० थॅलेसेमिया रुग्ण उपचार घेत आहेत. रक्ताचा साठा नसल्याने सध्या या बालकांसाठी आता रक्तदाते शोधण्याची वेळ आली आहे. ‘आमच्याकडे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६० बालकांची नोंद असून यातील बहुतांश बालकांना आता रक्त चढविण्याची आवश्यकता आहे. परंतु रुग्णालयात रक्तच उपलब्ध नसल्याने त्यांना रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे यांच्यासाठी दाते मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे समाजसेवक किशोर सातपुते यांनी सांगितले. शहरात केईएम, नायर, कूपर, वाडिया, के. बी. भाभा रुग्णालय, जी. टी. रुग्णालय, अनेक पालिका आणि सरकारी रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध नाही.

पुन्हा गतवर्षांतील स्थिती निर्माण होण्याची भीती

गेल्या वर्षी मार्चमध्ये करोना संसर्गामुळे हीच अवस्था निर्माण झाली होती. त्यानंतर एप्रिल, मेमध्ये तर परिस्थिती आणखी गंभीर झाली होती. करोनाचा ससंर्ग पुन्हा वाढत असल्याने याही वर्षी पुढील दोन महिन्यांत रक्त मिळविण्यासाठी रुग्णांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आतापासूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत समाजसेवक राहुल साळवे यांनी व्यक्त केले.

‘रक्त संक्रमण परिषदेचे दुर्लक्ष’

करोनाकाळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी मोठय़ा कंपन्यांशी संपर्क साधून छोटय़ा स्तरावरील रक्तदान शिबिरे घेण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेने पुढाकार घ्यावा. तसेच रक्तदान करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेकजण तयार असतात. परंतु त्यांना आठवडाभरात कामाच्या वेळांमध्ये शक्य नाही. तेव्हा रक्तपेढय़ांमध्ये शनिवारी, रविवारीही रक्तसंकलन करण्याची सुविधा निर्माण करावी, असे अनेक पर्याय परिषदेला आम्ही सुचविलेले आहेत. परंतु परिषदेने यावर काम तर केलेच नाही, परंतु साधे उत्तरही आम्हाला पाठविलेले नाही, असे साळवे यांनी सांगितले.

करोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे संभाव्य रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन छोटी शिबिरे घेऊन रक्ताचा साठा करून ठेवण्याच्या सूचना राज्यभरातील रक्तपेढय़ांनी दिलेल्या आहेत. लसीकरणामुळेही रक्तसाठय़ावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तेव्हा लस घेण्यापूर्वी रक्तदान करावे.

– डॉ. अरुण थोरात, अध्यक्ष, राज्य रक्त संक्रमण परिषद