कारागृहात आपल्या जिवाला धोका असून, कुणीतरी आपली हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तिची आई इंद्राणी मुखर्जी हिने सोमवारी विशेष न्यायालयासमोर व्यक्त केली.

भायखळा येथील आपल्या बराकीमध्ये काही दिवसांपूर्वी इंद्राणी बेशुद्धावस्थेत आढळून आल्यावर तिला जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषधांच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने तिला हा त्रास झाल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झाले होते. उपचारानंतर पाच दिवसांनी तिला पुन्हा कारागृहात नेण्यात आले. परंतु, आपल्याला यापूर्वीही असाच त्रास झाला होता, असे सांगत आपल्या जिवाला धोका असून कुणीतरी आपल्या हत्येचा प्रयत्न करत असल्याची भीती इंद्राणीने विशेष न्यायालयासमोर व्यक्त केली.

दोन वेळा आपल्यासोबत असा प्रकार घडला. कुणीतरी आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिसऱ्या वेळेला मी जिवंत राहीन की नाही माहीत नाही, अशी भीती तिने व्यक्त केली. न्यायालयाने तिचे म्हणणे ऐकून घेतले असले तरी त्याबाबत काहीही निर्देश दिलेले नाहीत.