रश्मि जोशी यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलीकडच्या काळात कोणत्याही कंपनीत कामासाठी रुजू करतेवेळी लिंगभेद होत नाहीत. पूर्वी कंपन्यांत महिलांना या समस्येचा सामना करावा लागत होता. मात्र सध्याच्या काळात कंपनी कायद्यानुसार आरक्षण असल्याने महिलांना प्राधान्य दिले जाते, असे प्रतिपादन कॅस्ट्रोल इंडियाच्या मुख्य वित्तीय अधिकारी आणि पूर्णवेळ संचालिका रश्मि जोशी यांनी ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात केले. केसरी टूर्स प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंज कार्यक्रम शुक्रवारी महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे पार पडला.

अनेकदा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना कार्यालयात उशिरा थांबणे गरजेचे असते. पूर्वी लग्न, गरोदरपणातील सुट्टी या सगळ्या गोष्टी कंपनीकडून विचारात घेतल्या जायच्या आणि महिलांना डावलण्याचा प्रकार होता. महिला अधिकारी म्हणून कंपनीत रुजू झाल्यावर काही पुरुषांकडून केवळ महिला आहे म्हणून कामाच्या कुवतीची तपासणी केली जात होती. अशा वातावरणात काम करताना ताण जाणवत होता. मात्र आपण एखादा निश्चय केल्यावर आपल्या गोष्टी साध्य होतात. आपण आपले काम झपाटून केल्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व तयार होत असते. याशिवाय आपल्याला कामाच्या ठिकाणी स्वीकारले जात नाही, असेही जोशी यांनी सांगितले.

कॉपरेरेट क्षेत्रात काम करताना तुमच्या कामाचा कंपनीला उपयोग करून देणे महत्त्वाचे असते. इतर क्षेत्राप्रमाणेच कॉर्पोरेट क्षेत्रातही स्पर्धा आहेत, मात्र स्पर्धेचे राजकारण होणे कंपनीच्या हिताचे नसते. आपल्या तत्त्वांशी साधर्म्य साधणाऱ्या कोणत्याही कंपनीत काम करताना कामाचे समाधान मिळते, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही कंपनीमध्ये काम करताना खुले मत मांडता येणे महत्त्वाचे असते. त्यामुळे एकत्रितरीत्या काम करताना समूहाकडून निर्णयात चूक होत नाही. वेगवेगळ्या देशांची संस्कृती वेगळी असते. त्यानुसार आपण काम करताना आपली शैली कशी बदलायला हवी हे शिकता आले, असे अनुभव त्यांनी कॅस्ट्रोल इंडियाच्या कामाविषयी बोलताना श्रोत्यांसमोर मांडले.

भारतातील अनेक तरुण शिक्षणासाठी परदेशात जायचे ठरवतात, मात्र भारतातही शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी आहेत. परदेशातील अनेक विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी येत आहेत. सध्या सतत बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानाचे मोठे आव्हान तरुण, महिलांसाठी आहे. तरुणांनी साचेबद्ध न राहता विविध पर्यायांचा विचार करत आपल्या

देशातील संधींचा उपयोग करून घ्यायला हवा, असे मार्गदर्शन त्यांनी तरुणांना केले. कॉपरेरेट विश्वात आर्थिक बाजू सांभाळताना येणारी आव्हाने, उपयुक्त असलेली निर्णयक्षमता याविषयी त्यांनी उपस्थितांसमोर आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत येत्या शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या व्हिवा लाउंज पुरवणीत प्रसिद्ध होईल.