विमा आयोगाच्या आदेशानंतरही अंमलबजावणीबाबत कंपन्या ढिम्म

निशांत सरवणकर, मुंबई</strong>

मानसिक आरोग्य विधेयकानुसार मनोविकारांसाठी विमा संरक्षण देण्याचा स्पष्ट आदेश विमा नियामक आयोगाने देऊन तीन महिने उलटले तरी कंपन्यांनी त्याची अमलबजावणी केली नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर कंपन्यांनी जे नवे प्रस्ताव सादर केले आहेत, त्यात याबाबतचा उल्लेख नसल्याचे आढळून येते.

भारतात सात कोटी मनोरुग्ण आहेत. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या उपचारासाठी लागणारा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर जात असतानाही विमा कंपन्यांनी या आजाराला विमासंरक्षण नाकारले होते. मानसिक आरोग्य विधेयकात त्याबाबत उल्लेख होता.तरीही प्रत्यक्षात कृती होत नव्हती. काही विमा कंपन्यांनी रस दाखविला असला तरी त्या भरमसाठ अतिरिक्त हफ्ता आकारण्याच्या तयारीत होत्या. विमा कंपन्यांनी मानसिक आजारांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट आदेश विमा नियामक आयोगाने १६ ऑगस्ट रोजी दिले आहेत.

या आदेशाबाबत काही विमा कंपन्यांना विचारले असता, त्यांनी याबाबत विचार सुरू असल्याचे मत व्यक्त केले. मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीने मानसिक आरोग्यांना विमा संरक्षणाचा उल्लेख अद्याप आपल्या प्रस्तावात केलेला नाही. याबाबत विचारले असता, याबाबत विचार ुसरू आहे, असे उत्तर दिले तर अंतिम निर्णय झाल्यावर सध्याच्या ग्राहकांनाही तो लाभ घेता येईल, असे मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्सच्या एका एजंटने सांगितले.

अपोलो म्युनिक हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या प्रवक्तयानेही तीच प्रतिक्रिया दिली. याबाबत आदित्य बिर्ला, रेलिगेअर, बजाज अलायन्स या कंपन्यांशी संपर्क असता अधिक माहिती देण्यास नकार दिला. विमा नियामक आयोगाचे चेअरमन डॉ. सुभाष खुंटिया यांचा संपर्क होऊ शकला नाही.

का हवे विमा संरक्षण?

मानसिक आजारानी ग्रस्त रुग्णांमध्ये  स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी रुग्णांवर इलेक्ट्रोकन्वल्सिव्ह थेरपी म्हणजेच शॉक ट्रीटमेंट हा एक प्रभावी उपचार आहे. याशिवाय रिपिटिटिव्ह ट्रान्सRॅ निअल मॅग्नेटिक तसेच थीटा बर्स्ट आदी उपचार उपलब्ध आहेत. देशातील सात कोटींपैकी ३५ लाख रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु उपचारांची सोय केवळ ४० रुग्णालयांत असून त्यात फक्त २६ हजार खाटा आहेत. सरकारी रुग्णालयातील परिस्थिती आशादायक नसल्यामुळे खासगी उपचारांशिवाय पर्याय नसतो. मात्र हे सर्व उपचार खर्चिक आहेत.

कर्करोग, हृदयरोगासह बहुतांश सर्वच रोगांना विमा संरक्षण आहे. मनोविकार हे मेंदूशी संबंधित आहेत. प्रत्यक्षात मनोरोग एखाद्याचे आर्थिक गणित जितके बिघडवतो तेवढा अन्य कुठलाही आजार नाही. त्यामुळे मानसिक आजारांना विमासंरक्षण आवश्यक आहे 

— डॉ. संदीप जाधव, मानसोपचार तज्ज्ञ