News Flash

शिवसेना आणि भाजपमध्ये सुसंवाद राखणारा कुणी नेता उरला नाही – उद्धव ठाकरे

काही दिवसांपूर्वीच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला सहभागी करून घेण्यात आले नव्हते.

शिवसेनेचा दिल्लीशी असलेला संपर्क तुटला असून भाजपशी सुसंवाद ठेवणारा कुणी नेता उरला नसल्याची खंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विचार मांडले. काही दिवसांपूर्वीच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला सहभागी करून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्वाविषयी मनात असलेली नाराजी उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. देशाला अजूनही बोले तैसा चाले असे वागणारा राज्यकर्ता लाभलेला नसल्याचे सांगत त्यांनी एकीकडे नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. मात्र, दुसरीकडे  त्यांनी मोदी सगळे नीट करतील, असा आशावादही व्यक्त केला. मात्र, मुलाखतीचा एकुणच रोख पाहता गेल्या काही काळात भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेल्या दरीसाठी त्यांनी भाजपच्या नेत्यांनाच जबाबदार धरले. माझा दिल्लीशी संवाद फारसा नव्हता, पण पूर्वी एक काळ असा नक्कीच होता की, मग अटलजी असोत, आडवाणीजी असोत, त्यांचा काही जरी विषय असला तरी शिवसेनाप्रमुखांशी अगत्याने चर्चा करीत. महाराष्ट्रात प्रमोद महाजन होते. ते जरी महाराष्ट्राचे होते, तरी देशात महत्त्वाची भूमिका पार पाडीतच होते. दुर्दैवाने ते आपल्यातून लवकर गेले. गोपीनाथ मुंडे होते, ते देशपातळीवर कुठे पोहोचतात न् पोहोचतात तोच काळाने त्यांच्यावर घाला घातला. ही मंडळी शिवसेना-भाजपमधील मुंबई ते दिल्ली संवाद ठेवण्याचे काम करीत होती. ते दुवे तेवढे आता राहिलेले नाहीत, असे उद्धव यांनी म्हटले.
इंडिया मे अभी ‘फॉग’ चल रहा है- उद्धव ठाकरे
याशिवाय, मुलाखतीत उद्धव यांनी जाहिरातबाजी व अरूणाचल आणि उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्यावरूनही भाजपवर निशाणा साधला. काँग्रेसमुक्त देश करण्याचा मार्ग हा नाही. उत्तराखंड आणि अरुणाचलमध्ये राज्य आणण्याची घिसाडघाई करण्यापेक्षा पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणण्यासाठी शर्थ करा. देश तुम्हाला डोक्यावर घेईल. तसेच मोदी सरकार त्यांनी केलेल्या कामांची जाहिरात करीत असेल तर एका मर्यादेत त्यांनी ती करायला काहीच हरकत नाही. लोकांनासुद्धा कळालं पाहिजे की, आपण नक्की कोणत्या दिशेने चाललो आहोत. पण त्यांनी इतकी सगळी कामं केली आहेत, त्या कामांतून ठळक पाच कामं काढणं खरंच कठीण असल्याचा टोला यावेळी उद्धव यांनी लगावला. याशिवाय सरकारने  स्टँडअप इंडिया, स्किल इंडिया योजनांची घोषणा केली असली तरी त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे बाकी असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
कोणत्याही चौकशांमध्ये शिवसेना सापडणार नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 8:18 am

Web Title: there is no leader form bjp who keeps coordination between two parties says uddhav thackeray
Next Stories
1 ‘बेस्ट’ प्रवाशांकडून वाहकांविरोधात ३९१ तक्रारी!
2 विधिमंडळ अधिवेशन : उपसभापतिपदाची काँग्रेसला प्रतीक्षाच!
3 पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचे कोटय़वधी रुपये पडून
Just Now!
X