सुजय विखे-पाटील भाजपात सामिल झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे दुसरे नेते बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे-पाटलांवर टीका केली होती. विखेंच्या पक्षनिष्ठेबाबत शंका असल्याचे विधान थोरात यांनी केले होते. तसेच याबाबत विखेंनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही त्यांनी केली होती. याला विखेंनी उत्तर दिले आहे.

विखे म्हणाले, थोरात स्वतःला हायकमांडपेक्षा मोठे समजतात, त्यामुळे थोरातांच्या विधानाला मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, मला जर काही स्पष्टीकरण द्यायचे असेल तर हायकमांडला उत्तर देईल. पक्षनिष्ठेबाबत बोलायचे झाले तर मी थोरातांचे उद्योगही सांगू शकेन मात्र, आजचा हा विषय नाही.


तसेच विरोधीपक्ष नेते पदाच्या राजीनाम्याबाबत बोलताना विखे म्हणाले, याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील तो मला मान्य असेल. त्यामुळे हा निर्णय मी हायकमांडवर सोडला आहे.

दरम्यान, भाजपात प्रवेश करण्यापूर्वी सुजयने आपल्याशी चर्चा केली नाही. मात्र, ज्याला त्याला आपल्या विचारांचे स्वातंत्र आहे, त्यामुळे जर भाजपात आपल्याला चांगली संधी असेल असा सुजयला विश्वास असेल तर तो त्या वैयक्तिक विषय आहे. दरम्यान, शरद पवारांच्या बाळासाहेब विखेंबाबतच्या विधानामुळे नाराज झालेल्या सुजयने भाजपात प्रवेश केला, असेही यावेळी विखे म्हणाले.