पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन

मुंबई : लोकसभा निवडणूक लढविण्याची योग्य वेळ अजून आलेली नाही, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊनच राज्य सरकारने निर्णय घेतला असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

राष्ट्रीय राजकारणात जाण्यात आपल्याला रस आहे, मात्र आपल्या इच्छेनुसार तो निर्णय घेऊ, असे पंकजा मुंडे यांनी गेल्यावर्षी सांगितले होते. त्यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी एकत्र लढत असून भाजप-शिवसेना स्वतंत्र लढल्यास प्रीतम मुंडे यांच्यापुढील अडचणी वाढतील. त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढविण्याची सूचना भाजपकडून दिली जाण्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणूक लढविणार का, असे विचारता पंकजा मुंडे यांनी ही शक्यता फेटाळून लावली. भाजपकडूनही याबाबत कोणतीही सूचना करण्यात आली नसल्याचे सांगितले. याबाबतचा निर्णय त्या योग्य वेळी घेणार आहेत.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर बालसंगोपनासाठी करावयाच्या किट वाटपावरूून आरोप केले आहेत. ही किट तान्ह्य़ा बाळांच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा धनंजय मुंडे यांचा दावा आहे. तो खोडून काढताना पंकजा मुंडे म्हणाल्या, गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलांचे नीट संगोपन होत नाही व सुविधा देण्याची मातांची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे बाळांसाठी ब्लँकेट, तेल, थर्मामीटर व संगोपनासाठी आवश्यक अन्य साहित्य या किटमधून दिले जाणार आहे. अनेक देशांमध्ये व अन्य काही राज्यांमध्ये अशा प्रकारे किट पुरविले जाते. आम्ही केलेल्या पाहणीमध्येही त्याची गरज लक्षात आली. अजून निविदाप्रक्रिया झालेली नसताना आरोपांची मालिका आधीच सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.