नगरच्या महापौर निवडणुकीत आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठींबा द्यायला तयार होतो. परंतू निवडणुकीच्या तीन दिवस आधीपर्यंत कोणीही स्थानिक नेते आमच्याशी बोलायला तयार नव्हते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले, मी स्वतः आमच्या नेत्यांना सांगितले होते की, शिवसेनेकडून जर प्रस्ताव आला तर त्यांना बिनशर्त पाठींबा द्या. मात्र, निवडणुकीपूर्वी तीन दिवस आमच्याशी कोणीही संवाद साधला नाही. उलट तुम्हीच आमच्या नेत्यांशी बोला आणि आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ असं सांगण्याची सुचना स्थानिक शिवसैनिकांनी आमच्याकडे केली. दरम्यान, शिवसेनेकडून स्वतःहून मागणी होत नसल्याने प्रसंगानुरुप निर्णय घेण्यास मी आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीचा पाठींबा कसा काय घेतला? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, महापौर आणि उपमहापौरपदासाठी आमचे उमेदवार होते. आम्ही येथे राष्ट्रवादीला पाठींबा दिलेला नाही, उलट त्यांनी आम्हाला मतं दिली आहेत. त्यामुळे पाठिंब्याबाबतचा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.