विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत दूध उत्पादकांच्या मागण्यांवर आजही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे दूध आंदोलन पुढे सुरु राहणार असल्याचे चिन्हं आहे. अद्याप या आंदोलनाचा नागरिकांना थेट फटका बसला नसला तरी काही प्रमुख डेअऱ्यांनी दूध संकलन बंद केल्याने शहरांतील दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

राज्यात सुरु असलेल्या दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मंगळवारी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार आदी प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली प्रति लिटर ५ रुपये थेट अनुदानाच्या मागणीला सरकारने नकार दिला. त्यामुळे आता गुरुवारी पुन्हा यासंदर्भात बैठक होणार असून यामध्ये राज्यातील एक लाख लिटरपेक्षा अधिक दूध संकलन करणारे सरकारी आणि खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारसोबतही या आंदोलनाच्याबाबतीत चर्चा झाली मात्र तेथेही यावर तोडगा निघू शकलेला नाही.

दरम्यान, राज्यात विविध भागात आजही आंदोलकांनी हिंसक आंदोलने केली. यांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी कुर्डुवाडी-बार्शी रोडवरील रिधोरे येथे नेचर दूध कंपनीचा दूध वितरणाचे दोन टेम्पो अडवून त्यातील ५ हजार लिटर दूधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून दिल्या. तसेच या टेम्पोच्या काचा आणि टायर फोडले.