परप्रांतीयांविरोधात कायम आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे चक्क परप्रांतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. २ डिसेंबरला होणाऱ्या एका कार्यक्रमात राज ठाकरे हजर राहणार आहेत. उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत अशी बातमी समोर आली. ज्यानंतर यामागचे कारण काय असावे? असा प्रश्न सगळ्या महाराष्ट्रालाच पडला. मात्र याबाबतचीही माहिती संदीप देशपांडे यांनी ट्विट करून दिली आहे.

उत्तर भारतीय मंचाच्या एनजीओने राज ठाकरेंना निमंत्रण दिले आहे. राज ठाकरे यांचे विचार काय आहेत हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. तसेच त्यांच्याकडे उत्तर भारतीयांच्या विकासासाठी काही कल्पना असतील, योजना असतील तर त्यादेखील जाणून घ्यायच्या आहेत. विचारांचे आणि कल्पनांचे आदानप्रदान करण्यात गैर काय? असा प्रश्न विचारत संदीप देशपांडे यांनीच राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर का उपस्थित राहणार आहेत ते स्पष्ट केले आहे. ज्या एनजीओने राज ठाकरेंना बोलावले आहे त्याचे अनेक सदस्य मागील दोन तीन पिढ्यांपासून महाराष्ट्रात राहतात. उत्तर भारतीयांचे विचार, राज ठाकरेंचे विचार यांचे आदानप्रदान होण्यात काहीही गैर नाही असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

येत्या २ डिसेंबर रोजी कांदिवलीतील बुराभाई हॉल येथे उत्तर भारतीय महापंचायतीचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ते या कार्यक्रमात उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. दि. १२ ऑक्टोबर रोजी ठाकरे यांना उत्तर भारतीय महापंचायतीने कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी राज यांनी आयोजकांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते. परंतु, आता संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारल्याचे जाहीर केले. आता हे निमंत्रण का स्वीकारले तेही संदीप देशपांडे यांनीच सांगितले आहे.