करोनाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी हा अखेरचा पर्याय असल्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले असले तर महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मात्र ‘अर्थचक्रा’ला झळ बसू नये याचीदेखील काळजी सरकार घेत असून राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने अधिक प्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिविरचा पुरवठा करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

करोनाच्या देशभरातील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस मुख्यमंत्री ठाकरे दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत असल्याची माहितीही दिली. राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर, परिचारिका यांचीही मदत घेण्यात येत असून रुग्णांस तात्काळ योग्य ते उपचार सुरू व्हावेत म्हणून टेलीमेडिसिन व टेलीआयसीयूवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता प्राणवायू आणि रेमडेसिविरचा पुरवठा अधिक प्रमाणात होणे आवश्यक आहे. रेमडेसिविर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही, पण  रुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिविरमुळे कमी होतो. राज्याला दररोज ७० हजार कुप्यांची गरज आहे. मात्र दररोज २७ हजार कुप्यांचे वाटप होत असल्याने परिणामी प्राणवायूचा वापर, खाटांची उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर ताण पडत असल्याने रेमडेसिविर अधिक प्रमाणात उपलब्ध व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

राज्याला दररोज  १५५० मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता असून सध्या ३०० ते ३५० मेट्रिक टन प्राणवायू बाहेरून आणला जात आहे. सातत्याने करोना रुग्णांची  वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मेट्रिक टन प्राणवायूचा अतिरिक्त साठा उपलब्ध असणे गरजेचे असून त्यासाठी केंद्राने वाढीव साठा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

तसेच राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यातून प्राणवायू उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याऐवजी जवळपासच्या राज्यातून पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल. तसेच रेल्वेने प्राणवायू आणण्याचा प्रयत्न केला. पण प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ‘वायुदलाची‘ व ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत द्यावी. प्राणवायू विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर वायूदलाच्या विमानाने प्राणवायू उत्पादनाच्या ठिकाणी पाठवावेत आणि प्राणवायू भरून इतर मार्गाने राज्याला मिळावे, अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी के ली. त्याचप्रमाणे १३ हजार जम्बो सिलेंडर व सुमारे ११०० व्हेंटिलेटर देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

‘कोणत्या राज्याला किती लस?’

लसीच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के राखीव साठ्यातून सर्व राज्यांना आणि खासगी रुग्णालये तसेच उद्योग समुहाच्या रुग्णालयांना लस पुरविली जाणार आहे. मात्र कोणत्या राज्याला ती किती प्रमाणात पुरविली जाईल त्याविषयी केंद्राने स्पष्टीकरण करण्याची मागणी ठाकरे यांनी केली.

‘प्राणवायूच्या वाहतुकीसाठी रेल्वे, हवाई दलाची मदत’

नवी दिल्ली : टँकरने वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करताना होणारा कालापव्यय कमी करण्यासाठी सरकार रेल्वे आणि हवाई दलाची मदत घेत असून जीवरक्षक वायू आणि औषधांची गरज भागविण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी एकत्रित काम करणे नितांत गरजेचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे सांगितले. करोनाचा मुकाबला करताना वैद्यकीय प्राणवायुचा तुटवडा भासत असल्याची बाब अनेक राज्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मोदी यांनी हा निर्णय घेतला. एकत्रित प्रयत्न आणि रणनीती यांच्या आधारावर भारताने करोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे मुकाबला केला त्याचप्रमाणे आताही या आव्हानाचा मुकाबला करण्याची गरज आहे. केंद्र सरकारकडून या लढ्यात सर्व राज्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वाासन मोदी यांनी या वेळी दिले.