शरद पवार काय बोलतील आणि काय करतील यावर विश्वास नाही. शरद पवार कोणालाही समजणार नाहीत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. मकरंद अनासपुरे यांच्या ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात ते बोलत होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचार करताना आम्ही सत्तेत येऊ असे वाटले नव्हते. त्यावेळी काही जणांनी आश्वासने द्यायला सांगितली. आम्ही एवढी आश्वासने दिली की ती आता आठवतही नसल्याचे यावेळी त्यांनी मान्य केले.
या कार्यक्रमाला नितीन गडकरी आणि अभिनेते नाना पाटेकर प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार यांना राजकारणात कोणीही ओळखू शकत नाही. पवार यांना कृषी, ग्रामीण, शैक्षणिक, पक्ष संघटन आणि सामाजिकसह सर्वच बाबींचे ज्ञान आहे. ही शरद पवार यांची जमेची बाजू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पवार यांची खटकणारी बाब कोणती असे विचारले असता ते म्हणाले की, ते काय बोलतात आणि काय करतात हे कळतच नाही.
उद्धव ठाकरेंबाबत बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवेसेनेचे चांगले नेतृत्व केले आहे. मराठी माणसाबद्दल त्यांना आपुलकी आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवे. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. जर त्यांनी तळागाळातील लोकांसोबत काम केल्यास पक्षाला चांगला फायदा होईल.
आठवलेंबाबत गडकरी हसत म्हणाले की, त्यांना कुठे काय बोलावे आणि कविता कधी म्हणावी समजत नाही. ते मुद्दाम करत नाहीत. पण त्यांच्याकडून अशा चुका होतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 4, 2018 11:10 pm