एखादी गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्याच्या घडीला सोशल मीडियाचा सर्रास वापर केला जातो. ‘किसान लाँग मार्च’ म्हणजेच शेतकऱ्यांच्या मोर्चालाही सध्या असाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव, कृषिपंप वीजबिल माफी आणि अशा सर्व मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी आलेल्या हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा सोशल मीडियावर विविध कारणांनी चर्चेत आला आहे. कोणी या मोर्चातील फोटो पोस्ट केले आहेत, तर कोणी अवघ्या काही सेकंदांचा व्हिडिओ. मुळात शेतकरी हा अनेकांच्याच जवळचा असल्यामुळे आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्यामुळे अनेकांनीच या बळीराजाला आपल्या परिने पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं.

सोशल मीडियावर या मोर्चातील काही फोटो आणि मोर्चासंबंधीच्या काही कलात्मक पोस्ट अनेकांनीच शेअर करत शक्य तितक्या सर्व मार्गांनी अन्नदात्याचे हे प्रयत्न मोठ्या स्तरावर इतरांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले. त्याच पोस्टपैकी गाजलेल्या आणि प्रभावी पोस्ट खालीलप्रमाणे…

सतीश आचार्य यांनी ट्विट केलेल्या या चित्रातून बऱ्याच गोष्टी मांडण्यात आल्या. लाल बावटा घेऊन मुंबईच्या दिशेने आलेल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीला यातून सलाम करण्यात आला.

प्रसिद्ध कार्टूनिस्ट मंजुळ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोर्चाकडे बारीक नजरेने पाहात असल्याचं हे चित्र पोस्ट केलं. जे अनेकांनीच व्हॉट्स अॅपच्या माध्यमातूनही शेअर केलं.

ऑल इंडिया किसान सभेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोलासुद्धा बरेच शेअर्स मिळाले.

वाचा : राजकारण बाजूला सारून शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चाला साथ देऊया- हुमा कुरेशी

या मोर्चाशी निगडीत आणखी एक पोस्ट बरीच व्हायरल झाली. तुटलेली आणि रक्ताचा डाग असलेली ही स्लीपर बरंच काही सांगून जात होती. अशी ही पोस्ट खऱ्या अर्थाने बळीराजाच्या मोर्चाचं कथन करत होती, असं म्हणायला हरकत नाही.