नवी मुंबई महानगरपालिकेत मंगळवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. ठराव मंजूर करतेवेळी नगरसेवकांनी आयुक्त मुंढेंवर आरोप केले. परंतु यासंदर्भात महापौरांना विनंती करूनही त्यांनी बोलण्याची संधी दिली नसल्याची खंत आयुक्त मुंढे यांनी व्यक्त केली. जोपर्यंत आपण या पदावर आहोत तोपर्यंत कायद्याच्या चौकटीतच काम करणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
मंगळवारी दुपारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मंजूर करतेवेळी नगरसेवकांनी या प्रस्तावावर चर्चा केली. या चर्चेत मुंढेंवर विविध आरोप करण्यात आले. त्यामुळे आयुक्त मुंढे यांनी महापौर सुधीर सोनावणे यांना आपली बाजू मांडण्याची संधी मागितली. परंतु महापौरांनी त्यांनी बोलण्याची संधी दिली नाही. जोपर्यंत शासन बदली करत नाही. तोपर्यंत मी पदावर कायम आहे. त्यामुळे माझे काम पूर्वीप्रमाणेच चालू राहील. यापूर्वीही मी कायद्याच्या चौकटीतच काम केले. यापुढेही तसेच काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
दरम्यान, महापौर सुधीर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांनी आयुक्त मुंढेंना त्वरीत बोलवावे व प्रतिनियुक्तीवर दुसरे आयुक्त देण्याची मागणी केली आहे. तत्पूर्वी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात महापालिकेच्या विशेष सभेत १०५ विरूद्ध ६ मतांनी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.