ठाण्यात दहशतवादी असल्याची बतावणी करून भीती पसरवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचजणांसंदर्भातील चक्रावून टाकणारी माहिती पुढे आली आहे. या पाचजणांनी केवळ टॅक्सीचे भाडे द्यायला लागू नये, यासाठी दहशतवादी असल्याची बतावणी केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी उरणमध्ये दहशतवादी शिरल्याच्या संशयावरून राज्यभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. जीतू झा, प्रदीप पीसल, सैयद शैकाल्कल, नागेंद्र यादव आणि अखिलेश ओझा याच घटनेचा फायदा उचलायचे ठरवले. या पाचजणांनी शुक्रवारी रात्री भांडुपहून एका ओला टॅक्सीची ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी नोंदणी केली. टॅक्सीत बसल्यानंतर टॅक्सीचालकाचा घाबरवण्यासाठी त्यांनी उरणमधल्या दहशतवाद्यांबाबत चर्चा करण्यास सुरूवात केली. त्यातल्या एकाने तर ‘हॉस्पिटल का जायजा लेंगे और मुंबई में जाकर धमाका करेंगे,’ असे उद्गार काढल्याने टॅक्सीचालकाचा जीवही टांगणीला लागला होता. अखेर त्यांना रुग्णालयात सोडल्यावर टॅक्सीचालकाने थेट पोलीस ठाणे गाठून ही माहिती दिल्यावर पोलिसांची एकच धावपळ उडाली होती. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या या पाचजणांनी केवळ टॅक्सीचे भाडे टाळण्यासाठी हा उपद्व्याप केल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले.

शुक्रवारी मध्यरात्री भांडुप परिसरातून हे पाचजण एका ओला टॅक्सीत बसले. नोंदणीप्रमाणे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे टॅक्सी निघाली. पण प्रवासभर या पाचजणांचे बोलणे संशयास्पद वाटल्याने टॅक्सीचालक घाबरला. उरणमधून शिरलेले पाचजण हेच असावेत, असा संशय आल्याने त्याच्या धास्तीत वाढ झाली. या पाचहीजणांचे बाह्य़ रूपही संशय वाढविणारेच होते. रुग्णालयाजवळ टॅक्सी आल्यावर एकजण रुग्णालयात गेला तर चौघे रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच थांबले. हे पाहून टॅक्सीचालकाने थेट ठाणेनगर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना सर्व माहिती दिली. त्यानंतर ठाणेनगर पोलिस फौजफाटा घेऊन रुग्णालयात पोहचले. रुग्णालय तसेच आजूबाजूचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. रेल्वे स्थानकातही कसून तपास केला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले. अखेर नोंदणीच्या आधारे पोलिसांनी भांडुप गाठून त्या पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी एकाची पत्नी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल असून  तिला भेटण्यासाठी ते रुग्णालयात गेल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले.
दरम्यान, या पाच जणांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम ५०५ (१) (ब) अंतर्गत लोकांमध्ये घबराट पसरविण्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे  वायफळ बडबड करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना जरब बसेल, असे ठाणेनगर पोलिस ठाण्यााचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले.