मुंबई : एका ‘व्हॉट्सअ‍ॅप डीपी’वरून आग्रीपाडा पोलिसांनी दीड वर्षांपूर्वी चोरीला गेलेला पाच तोळ्यांचा सोन्याचा हार चोरणाऱ्या मोलकरणीला बेडय़ा ठोकल्या आहेत. चोरी झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एका डीपीवरून पोलिसांनी पश्चिम बंगालच्या नक्षलग्रस्त जिल्हय़ातून हा हार हस्तगत केला.

सातरस्ता परिसरातील कल्पवृक्ष इमारतीत राहाणाऱ्या श्रीमंत कुटुंबाच्या घरात ही चोरी झाली. अलीकडेच तिजोरी उघडली तेव्हा पाच तोळे सोन्याचा हिरेजडित हार मिळाला नाही. नोकरांनाही जाब विचारला. मात्र कुणाकडे काहीच माहिती नव्हती. हार शोधताना घरातल्या आणखीही मौल्यवान वस्तू गायब झाल्याचे मालकिणीच्या लक्षात येऊ लागले. म्हणून त्यांनी आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

पोलिसांनी शिरस्त्यानुसार सर्वप्रथम त्यांनी घरातल्या चार नोकरांना दमात घेतले. कसून चौकशी केली. त्यांचे मोबाइल तपासासाठी ताब्यात घेतले. मोबाइलचा अभ्यास करता करता पोलीस हवालदार सचिन खानविलकर यांची नजर रिटा गोराय (४०) या मोलकरणीच्या फोनवर पडली.

रिटाच्या मोबाइलमध्ये तिच्या नातेवाईक, मित्रमंडळींचे व्हॉट्सअ‍ॅप डीपी साठवून ठेवले होते. त्यापैकी एका डीपीत म्हणजे छायाचित्रात मालकिणीच्या चोरी झालेल्या हाराशी मिळताजुळता हार खानविलकर यांना दिसला. ते छायाचित्र रिटाच्या भाच्याच्या पत्नीचे होते आणि तिच्या गळ्यात तो हार होता. वरिष्ठ निरीक्षक सावळाराम आगावणे यांच्या सूचनेनुसार ते छायाचित्र मालकिणीला पाठवण्यात आले. मालकिणीने ओळख पटवली.  रिटाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तिने तो हार दीड वर्षांपूर्वी चोरला होता. भाच्याच्या लग्नात त्याच्या पत्नीला भेट दिला होता. हारासोबत रिटाने त्या घरातून अनेक वस्तू लंपास केल्या होत्या. चोरीला गेलेल्या हाराला मालकिणीने दोन वर्षांत एकदाही हात लावला नव्हतो. रिटाचा भाचा पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त खेडय़ात वास्तव्याला आहे. साहाय्यक निरीक्षक पुराणिक, हवालदार खानविलकर आणि पथकाने भाच्याचे घर गाठून तो हार आता ताब्यात घेतला आहे.