विरार लोकलमधील घटना, आरोपी फरार

चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोराने एका तरुणीला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिल्याची घटना विरार लोकलमध्ये घडली. कोमल चव्हाण (१९) असे या तरुणीचे नाव आहे. या घटनेत ही तरुणी थोडक्यात बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी फरार असून वसई रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कोमल चव्हाण (१९) ही तरुणी नालासोपारा पश्चिमेच्या समेळपाडा येथील साकेत अपार्टमेंटमध्ये विरार येथे लॉटरी विक्रीचे काम करणाऱ्या व्यक्तीकडे राहते. दररोज काम संपवून ती रात्री पावणेदहाची ट्रेन पकडून नालासोपारा येथील घरी येते. गुरुवारी रात्री तिने विरारच्या फलाट क्रमांक १ वरून चर्चगेटला जाणारी ट्रेन पकडली. ती महिलांच्या दुसऱ्या श्रेणीच्या डब्यात चढली होती. त्या वेळी ट्रेनमध्ये एकही महिला प्रवाशी नव्हती. अचानक पंचविशीतला एक तरुण ट्रेनमध्ये शिरला आणि त्याने कोमलकडे पैशांची मागणी केली. कोमलने नकार देताच तो जबरदस्ती करू लागला. कोमलने मदतीसाठी धावा सुरू केला त्या वेळी ट्रेन सुरू झाली होती. आपला प्रयत्न फसल्याचे लक्षात येताच त्या चोराने कोमलला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले. एका प्रवाशाने रेल्वे पोलिसांना माहिती दिल्यानंतर कोमलला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिचा उजव्या हाताचा खांदा निखळला होता. तसेच हाताला आणि पायाला दुखापत झाली होती.  तिच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्या प्रकृतीचा धोका टळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलांच्या डब्यात पोलीस कर्मचारी नसल्याने ही घटना घडल्याचे कोमलच्या भावाने सांगितले.

आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असल्याचे पश्चिम रेल्वेचे उपायुक्त पुरुषोत्तम काकड यांनी सांगितले. या घटनेनंतर रेल्वे स्थानकातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.