विरार ते डहाणू चौपदरीकरणातील महत्त्वाचा टप्पा

मुंबई : विरार ते डहाणू चौपदरीकरणांतर्गत तिसरी व चौथी मार्गिका वैतरणा नदीवरून नेण्याचे मोठे आव्हान रेल्वेला पेलावे लागणार आहे. ही मार्गिका उभारण्यासाठी ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ला (एमआरव्हीसी) तब्बल तीन वर्षे लागणार आहेत. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होणार असून निविदा प्रक्रिया मार्च महिन्यात राबवण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

एमआरव्हीसीच्या एमयूटीपी-३ मध्ये विरार ते डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. सध्या येथे दोनच मार्गिका असल्याने लोकल व लांब पल्ल्याच्या गाडय़ा या मार्गावरून जातात. त्यामुळे लोकलचेही वेळापत्रक सुरळीत ठेवणे आणि विरार ते डहाणू मार्गावर फेऱ्या वाढवणे शक्य होत नाही. प्रकल्पासाठी एकूण १८० हेक्टर भूसंपादन आवश्यक असून ते अंतिम टप्प्यात आहे. एकूण ६४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पात आठ नवीन स्थानकांचीही भर पडेल.

विरार ते डहाणू चौपदरीकरणात एमआरव्हीसीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे काम वैतरणा नदीवरून जाणारी प्रकल्पातील तिसरी व चौथी मार्गिका असल्याचे सांगण्यात आले. वैतरणा नदीवरून सध्या दोन मार्गिका असून आणखी दोन मार्गिका टाकण्यासाठी मोठी कामे करावी लागतील. येथे असलेल्या पुलाला जोडूनच आणखी एक पूल उभारण्यात येईल आणि त्यावरून दोन नवीन मार्गिका टाकल्या जातील. यात खांब उभारण्यासाठी भराव टाकणे, त्यानंतर खांब उभारणी यांसह अन्य कामे करावी लागतील. ते होताच त्यावर गर्डर बसवावे लागतील. वैतरणा नदीवरील मार्गिकेचे काम हे दोन टप्प्यांतील आहे.

पहिल्या टप्पात प्रथम आठ गर्डर टाकून नदीवरील मार्गिकेचे काम पूर्ण होईल. काही अंतरावर पुढे जाताच जमीन लागते आणि त्यानंतर पुन्हा नदी सुरू होते. त्यामुळे पुढच्या टप्प्यात नदीवरील उर्वरित काम करावे लागेल. त्यासाठी आणखी नऊ गर्डर टाकून तिसरी व चौथी मार्गिका उभारण्यात येईल. हे काम करण्यासाठी साधारण तीन वर्षे लागणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पूल उभारणीचे आव्हान

ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेत मुंब्रा येथे दीड ते दोन किमी पूल उभारणीचे आव्हान एमआरव्हीसीसमोर आहे. त्यासाठीही गर्डर बसवणार असून हे गर्डर कोटा शहरातून येतील. या पुलाचे कामही साधारण दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे हे काम पाहता विरार ते डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात प्रथम वैतरणा नदीवर पूल उभारून मार्गिका करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

* यामध्ये वैतरणा नदीवरील दोन महत्त्वाचे पूल, त्यानंतर अन्य ठिकाणी असलेले १६ मोठे पूल आणि ६८ छोटे पूल

* ३,५७८  कोटी रुपये  प्रकल्पाची किंमत