‘अण्णा चलके गया लेकीन वापस कंधे पे आया’ अशा शब्दात शहीद उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन यांच्या बहिणींनी हंबरडा फोडला आणि सारे वातावरण हेलावून गेले. उपस्थित सर्वाच्याच डोळ्यात अश्रू तरळले..
शहीद अमीन यांचे पार्थिव गुरुवारी रात्री भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आणण्यात आले. तेव्हा अमीन यांच्या बहिणींनी एकच हंबरडा फोडला. अमीन यांचा मुलगा यश (इयत्ता ३ री) आणि मुलगी प्रणवी (चार वर्षे) यांना काय चाललेय ते समजत नव्हते. रडणारी आई व आत्या यांच्याकडे ते वारंवार पाहात होते.
मनमिळाऊ स्वभावामुळे अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकही मोठय़ा संख्येने अमीन यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. अमीन यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन बहिणी व दोन भाऊ असा परिवार आहे.  
तो दिवस आता कधीच येणार नाही
येत्या १७ जुलै रोजी अमीन यांच्या वयाला ५० वर्षे पूर्ण होणार होती. त्यानिमित्ताने छोटी पार्टी ठेवून हा दिवस साजरा करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र अमीन यांच्यावर काळाने झडप घातल्याने आता हा दिवस कधीच येणार नाही, असे सांगताना एका अग्निशमन अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आले.