05 April 2020

News Flash

मुंबईत करोना विषाणूचा तिसरा संशयित रुग्ण

तिघांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार

(संग्रहित छायाचित्र)

तिघांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार

मुंबई : करोना विषाणू संसर्गाच्या दोन संशयितानंतर अजून एक संशयित रुग्ण मुंबईत आढळला असून या तिघांनाही उपचारासाठी चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर शुक्रवापर्यंत १ हजार ७८९ रुग्णांची तपासणी केली असून यात राज्यातील सात जणांचा समावेश आहे. तर मुंबईतील रुग्णांसह देशभरात एकूण ११ जण संशयित असून त्यातील काही केरळमध्ये तर काही हैदराबादमध्ये आढळले आहेत.

चीनच्या वुहान शहरात ३१ डिसेंबर २०१९ रोजी करोना विषाणुंचा उद्रेक झाल्याचे जाहीर करण्यात आले. या पाश्र्वभूमीवर देशात मुंबईसह सात आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी सुरू केली आहे. यात मुंबईतील वसई आणि नालासोपारा येथे स्थायिक असलेल्या आणि चीनमधून परतलेल्या दोन जणांना सौम्य सर्दी, ताप अशी लक्षणे असल्याचे तपासणीत आढळले. प्रतिबंधात्मक म्हणून गुरुवारी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी मुंबईतील अजून एक संशयित रुग्ण विमानतळावरील तपासणीत आढळलेला आहे. त्यालाही शुक्रवारी सायंकाळी कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. चीनसह जपान, थायलंड, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेतही या विषाणूची बाधा झालेले रुग्ण नोंदले आहेत. त्यामुळे या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी मुंबई विमानतळावर केली जात असून शुक्रवारपर्यत १ हजार ७८९ रुग्णांची तपासणी केली गेली. यात मुंबईतील चार आणि पुण्यातील तीन जणांचा समावेश आहे. मुंबईतील तिघांना संशयित लक्षणे असल्याने कस्तुरबामध्ये दाखल केले असून उर्वरित प्रवाशांना लागण झाली आहे का यावरही देखरेख ठेवली जाईल, असे राज्य साथरोग विभागाने स्पष्ट केले आहे. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविले आहेत. याचा अहवाल शुक्रवापर्यंत येणे अपेक्षित आहे. बाधित देशातून आलेल्या प्रवाशांची २८ दिवसांपर्यंत दैनंदिन नोंद ठेवली जाणार आहे. संशयित रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत कस्तुरबा व पुण्यात नायडू रुग्णालयात सुविधा करण्यात आली आहे.

काय काळजी घ्याल

* श्वसनसंस्थेचे आजार असलेल्या व्यक्तींशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची खबरदारी घेणे

* हात वारंवार धुणे

* शिंकताना आणि खोकताना नाकातोंडावर रुमाल धरणे

* अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये

* फळे, भाज्या धुवूनच खाव्यात

करोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव आहे. साध्या सर्दी खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स सारख्या गंभीर आजारासाठी करोना विषाणू कारणीभूत असतात.

आजाराची लक्षणे

मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडित लक्षणे असतात. सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच लक्षणे असून सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, न्यूमोनिया, काही वेळ मूत्रपिंड निकामी होणे ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात.

आजार पसरतो कसा

विषाणूमुळे आजार कसा पसरतो याबाबत संदिग्धता असली तरी सर्वसाधारणपणे हवेतून शिंकण्या, खोकल्यावाटे पसरतो. करोना विषाणुंचा संसर्ग प्राण्यांमार्फत होतो.

एनआयव्हीचा अहवाल आला असून मुंबईतील दोन रुग्णांची करोना विषाणू चाचणी निगेटिव्ह आली आहे. यातील एका रुग्णाला सर्दीचा सर्वसाधारपणे आढळणारा संसर्ग झाला असल्याचे तपासणीत आढळले आहे. तसेच हैदराबाद आणि बंगळूरुमधीलही प्रत्येकी एका रुग्णाचे तपासणीसाठी पाठवलेल्या रक्ताच्या चाचणीचेही अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2020 2:07 am

Web Title: third suspected patients of coronavirus in mumbai zws 70
Next Stories
1 कर्तृत्वाने तळपणाऱ्या तरुणाईचा शोध सुरू
2 मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक
3 ‘मुंबई २४ तास’बाबत सावध पवित्रा!         
Just Now!
X