गेल्या चार आठवडय़ांपासून गर्भपाताच्या प्रतीक्षेत असलेल्या १३ वर्षीय बलात्कारपीडित मुलीने मुंबईतील सर जे.जे.रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. ही पीडित मुलगी ३२ आठवडय़ांची गर्भवती होती. गर्भाची वाढ झाल्याने शुक्रवारी सकाळी या मुलीवर  शस्त्रक्रिया करण्यात आली. ६ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या मुलीला गर्भपाताची परवानगी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी या मुलीला जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी साधारण १२.३० च्या सुमारास या  मुलीने १.८ किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला. दोघांचीही प्रकृती उत्तम आहे, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अशोक आनंद यांनी दिली.  ३२ आठवडय़ांत गर्भाची पुरेशी वाढ झालेली असते. त्यामुळे या मुलीचा गर्भपात न करता कुटुंबीयांच्या परवानगीनंतर सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली, असे डॉ. आनंद यांनी सांगितले. मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी या मुलीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी मदत केली होती.

भारतात २० आठवडय़ांवरील गर्भपातास कायद्याने परवानगी नाही. त्यामुळे गर्भपात करावयाचा असल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागते. स्त्रीरोगतज्ज्ञांनी गर्भपाताची मुदत वाढविण्याची मागणी केली आहे. न्यायालयातील कामकाजात या गर्भवती महिलांचे अनेक आठवडे जातात. अशी प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यात यावीत, असेही स्त्रीरोगतज्ज्ञांचे मत आहे.