जागावाटपाच्या मुद्द्यावरून एकमत न झाल्याने भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून भाजप आणि घटकपक्षांवर कडाडून टीका करण्यात आली. शिवसेना आणि भाजपची गेल्या २५ वर्षांची युती संपुष्टात येणे अत्यंत दुर्देवी घटना आहे. युती तोडण्याचा निर्णय म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचा अपमान करणारा असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. भाजप आणि घटकपक्षांसोबतची युती टिकवण्यासाठी शिवसेनेकडून अखेरपर्यंत खरेखुरे प्रयत्न करण्यात आल्याचे या अग्रलेखात सांगण्यात आले आहे. युती तुटल्यामुळे भविष्यात काय होणार, हे माहित नाही. परंतु, सत्तेचे राजकारण आणि गणितांमुळे महाराष्ट्राच्या भविष्याला धोका पोहचू नये एवढीच अपेक्षा असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कालपर्यंत एका तंबूत पाया पडणारे आता दुसऱ्या तंबूत नमाज पडतील, असे सांगत शिवसेनेने घटकपक्षांवरही निशाणा साधला आहे. तेव्हा विचार, निष्ठा या शब्दांना तसे काही मोलच उरलेले नाही हे पटते, अशा शब्दात त्यांनी महादेव जानकर आणि इतर मित्रपक्षांना सुनावले आहे.