‘खरेदी होती घरा तोचि दिवाळी, दसरा’ या आधुनिक म्हणीप्रमाणे गेला महिनाभर ऑनलाइन आणि ऑफलाइन बाजाराला चांगलाच बहर आला आहे. पणत्या, रोषणाईच्या माळा, कपडे, एसी, फ्रिज, ओव्हन, नवीन प्रकारची भांडी, मायक्रोमॅक्सच्या फोनपासून ते आयफोन ७पर्यंत एक ना अनेक वस्तूंनी बाजारात गर्दी केली आहे. गेल्या शनिवार-रविवारी तर खरेदीला चांगलेच उधाण आले होते. दिवाळी खरेदीचा हा माहोल यंदा पहिल्यांदा तयार केला तो ऑनलाइन बाजारजत्रेने. ऑनलाइन खरेदीच्या आक्रमक जाहिरातबाजीतून यंदा हा बाजार ऑफलाइनला गिळतो की काय असा एकूण नूर होता; परंतु ‘डोळय़ांनी पाहा, हाताळून बघा आणि मगच खरेदी करा’ या भारतीयांच्या मानसिकतेमुळे आजही ऑनलाइन बाजार ऑफलाइनवर कुरघोडी करू शकलेला नाही. उलट ऑनलाइनच्या भीतीने ऑफलाइन बाजारही कधी नव्हे तो ‘ग्राहककेंद्री’ झालेला दिसून येतो आहे.

पारंपरिक दुकानांपासून ते मॉलपर्यंत पोहोचलेली महानगरांमधील खरेदीची परंपरा गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइनकडे वळू लागली आहे. यासाठी ई-व्यापार संकेतस्थळांनी दिवाळीनिमित्ताने २० टक्क्यांपासून ते ८० टक्क्यांपर्यंतच्या सवलती देत खरेदीजत्रेचे आयोजन केले होते. यांच्या जोडीला मोबाइल वॉलेट्सनीही संधी साधत ई-व्यापार संकेतस्थळांशी हातमिळवणी करत अधिक सवलती देऊ केल्या. १०० रुपयांची वस्तू ५० ते ५५ रुपयांमध्ये उपलब्ध झाली. पैसे वाचणार म्हणून ग्राहक त्याकडे वळणारच म्हणूनच यंदा ई-व्यापार संकेतस्थळांनी भरविलेल्या खरेदीजत्रेच्या पहिल्या टप्प्यात तब्बल आठ हजार कोटींची उलाढाल झाली. यानंतर सर्वच संकेतस्थळांनी दिवाळी जवळ येताच खरेदीजत्रेचा दुसरा टप्पा सुरू केला. त्यातही त्यांना अपेक्षित यश मिळाले. बहुतांश कंपन्यांनी निश्चित केलेले उत्पन्न ध्येय साध्य केले तर काहींना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. यामुळे ऑनलाइन बाजारासाठी यंदाची दिवाळी लाभदायी ठरली. या ऑनलाइन बाजारात या वर्षी शहरे आणि निमशहरांमधून सर्वाधिक खरेदी झाल्याचे समोर आले. असे असले तरी या बाजारात रमणाऱ्या लोकांची टक्केवारी आजही अवघी सहा ते आठ टक्के इतकीच आहे. उर्वरित लोक आजही ऑफलाइन खरेदीलाच पसंती देतात. यामुळे ई-व्यापार संकेतस्थळांची ध्येयपूर्ती झाली असली तरी ऑफलाइन बाजारातही खरेदी तेजीत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स बाजाराला फटका

ऑनलाइन किंवा ऑफलाइन कुठेही तपास करा आमची किंमत सर्वात कमी असेल.. यंदाच्या दिवाळीत प्रथमच अशी जाहिरात करणारे फलक शहरांतील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांबाहेर झळकताना दिसले. इतकी वष्रे अगदी ‘फॅमिली डॉक्टर’प्रमाणे ठरलेल्या दुकानांची जागा ऑनलाइन बाजार घेऊ लागला आहे. याचा सर्वाधिक फटका इलेक्ट्रॉनिक्स बाजाराला बसला. यामुळे मुंबईतील लॅमिंग्टन रोडवरील या बाजारातील दर हे अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात खाली उतरले. आज या बाजारात ऑनलाइन बाजाराची तुलना करणाऱ्या दरात वस्तू मिळतात. इतकेच नव्हे तर वस्तू खरेदी केल्यावर त्यात काही बिघाड झाल्यावर वर्षभर मोफत सेवाही पुरवितात. ऑनलाइनमुळे ऑफलाइन बाजारात झालेल्या या महत्त्वपूर्ण बदलामुळे दुकानदारांचा नफा कमी झाला आहे. म्हणजे पूर्वी एका वस्तूच्या विक्रीतून दुकानदार १०० रुपये कमावीत असेल तर तो आता अवघे २० ते २५ रुपये कमावीत आहे. ऑनलाइन बाजारामुळे ऑफलाइन लॅपटॉप किंवा संगणक विक्रीला सर्वाधिक ८० टक्क्यांनी फटका बसल्याची खंत संगणक अभियंता व विक्रेते पराग जोशी यांनी व्यक्त केली. या मधल्या काळात केवळ विक्री करणाऱ्या अनेकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. त्या वेळेस जे कोणी सेवा पुरवठादार होते त्यांनीच तग धरल्याचेही जोशी म्हणाले. मात्र मधल्या काळात ग्राहकांना ऑनलाइन वस्तू खरेदी केल्यावर अनेकदा विक्रीनंतरच्या सेवेत अडचणी जाणवल्या. मग असे ग्राहक आता पुन्हा दुकानांच्या पायऱ्या चढू लागल्याचे ते म्हणाले. मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाबतीत ऑनलाइनचा प्रभाव हा आपल्याला मोठय़ा प्रमाणावर दिसत असला तरी मोठे विक्रेते आजही ऑफलाइन बाजारावरील विक्रीवरच अवलंबून आहेत. आजही ग्राहक टीव्ही किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे स्वत: पाहून विकत घेणे पसंत करतात. यामुळे ऑफलाइन विक्री अधिक असल्याने तीच आम्ही गृहीत धरतो, असे सॅनसुईचे सीओओ अमिताभ तिवारी यांनी नमूद केले, तर व्हिडीओकॉनचे अनिरुद्ध धूत यांनीही ऑफलाइन विक्रीच महत्त्वाची असल्याचे विशद केले. इतकेच नव्हे तर स्मार्टफोन विक्रेती कंपनी विवोचे सीएमओ विवेक झांग यांनीही स्मार्टफोनसाठी ऑफलाइन विक्रीच महत्त्वाची मानली जात असल्याचे सांगत ऑफलाइन जाळय़ामुळे कंपनीच्या उत्पादनांची विक्री वाढल्याचेही त्यांनी नमूद केले, तर ऑनलाइन खरेदीजत्रेच्या काळात स्मार्टफोनच्या दुकानातील विक्रीवर परिणाम होतो. ऑफलाइन स्मार्टफोन विक्रीला गेल्या दोन वर्षांत २० टक्क्यांइतका फटका बसल्याचे लॅमिंग्टनमधील व्यापारी दीपेश झगडे यांनी सांगितले. ऑनलाइनमुळे आम्हाला कमीत कमी नफा ठेवून उत्पादन विकावे लागते. अधिक नुकसान होऊ नये यासाठी सध्या ऑनलाइन बाजारात उपलब्ध असलेल्या विविध गॅजेट्सची विक्री न करण्याचे अनेक विक्रेत्यांनी ठरविल्याचे दीपेश सांगतात. त्यापेक्षा हे दुकानदार मोबाइलला पूरक हेडफोन, चार्जरसारख्या वस्तूंच्या विक्रीवर भर देत आहेत.

इतर बाजारातही उत्साह

विविध खेळांच्या वस्तू, चप्पल-बूट, शोभेच्या, गृहोपयोगी वस्तू, लाकडी फर्निचर, कपाटे अशा वस्तूंनीही ऑनलाइन बाजारात स्थान मिळवले असले तरी या उत्पादनांची ९८ टक्के बाजारपेठ ही ऑफलाइनच आहे. आपल्या घरातील गरजांनुसार फर्निचरची खरेदी करणे लोक पसंत करत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तसेच अनेक विक्रेतेही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही ठिकाणी विक्री करत असल्यामुळे त्यांना दोन्हीकडून ग्राहक मिळत असल्याचे निरीक्षण फर्निचर कारागीर आणि विक्रेता बशिर अहमद याने नोंदविले. थोडक्यात सणांच्या काळात ऑनलाइनचा देखावा उभा राहिला असला तरी प्रत्यक्षात त्याचा प्रभाव केवळ सहा ते आठ टक्के लोकांपुरताच मर्यादित आहे. निदान मुंबईतील बहुतांश ग्राहक आजही खरेदीसाठी ऑफलाइन बाजारावरच अवलंबून आहेत. याची जाणीव विक्रेते आणि उत्पादक कंपन्या यांना आहे. ऑनलाइनचा फटका काही बाजारांना बसला असला तरी मोठय़ा प्रमाणावर ऑफलाइन बाजार आजही सुरक्षित आणि विश्वासार्ह मानला जात आहे. ऑनलाइनचा फुगा आक्रमक जाहिरातबाजीने कितीही उंच उडविला गेला तरी यंदाच्या दिवाळीत खरी उलाढाल ऑफलाइन बाजारातच होणार आहे.

कापड बाजार ‘जैसे थे’

ऑनलाइन बाजाराचे आक्रमण हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जास्त आहे. तुलनेत कापड किंवा अन्य बाजारांवर त्याचा परिणाम झालेला दिसून येत नाही. आजही ग्राहक कपडय़ांकरिता दुकानात येणेच पसंत करतात. अगदी आभासी ‘ट्रायल रूम’ उपलब्ध झाली तरी कापडाला हात लावून पाहिल्याशिवाय खरेदी करणे आजही अनेकांना सोयीचे वाटत नाही, असे मंगलदास बाजारातील दुकानदार जितेनभाई यांनी सांगितले. ऑनलाइनमुळे ब्रँडेड कपडय़ांच्या बाजारावर परिणाम झाला असे आपण म्हणू शकतो. सध्या शहर-उपनगरांमध्ये विविध ठिकाणी छोटेखानी बाजार थाटले गेले आहेत. या बाजारांमध्ये बहुतांश वस्तू या मुंबईतील घाऊक बाजारातूनच घेतल्या जातात. या बाजारांमध्येही दिवाळीला खरेदीकरिता ग्राहकांची होणारी गर्दी कायम आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे, ज्या वेळेस घाऊक मागणी घटेल तेव्हा खऱ्या अर्थाने ऑनलाइनचा ऑफलाइन बाजारावर परिणाम झाल्याचे आपण म्हणू शकतो. यामुळे यंदाही मुंबईची कापड बाजारपेठ दिवाळीच्या काळात अब्जावधीची उलाढाल करण्याकरिता सज्ज आहे.

नीरज पंडित
@nirajcpandit