विद्यापीठाकडून निर्णयाला तत्त्वत: मान्यता

गणेशोत्सवाच्या तोंडावर राजकीय पक्षाच्या नेत्यांना खाद्य पुरविणारा शाळांच्या सुट्टीचा वाद यंदा  मुंबई विद्यापीठ किंवा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये उद्भवण्याची चिन्हे नाही. कारण, महाविद्यालयांमध्ये लांबलचक सुट्टीची मागणी होण्याआधीच विद्यापीठाने गणेशोत्सवाकरिता नऊ दिवसांची भरभक्कम सुट्टी देण्याच्या निर्णयाला तत्त्वत: का होईना मान्यता दिली आहे.

विद्यापीठाच्या विद्वत सभेत नुकताच या सुट्टीविषयीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आला. परंतु, यामुळे विद्यापीठाचे वर्षभराच्या शैक्षणिक वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत. कारण, सुट्टी असली तरी वर्षभरात अमुक इतके तास शिकविणे बंधनकारक आहे. हे तास दिवाळीच्या सुट्टीला कात्री लावून किंवा इतर दिवशी तासिकांची संख्या वाढवून महाविद्यालयांना भरून काढावे लागणार आहेत. परिणामी सुट्टीचा नसलेला मुद्दा उकरून काढण्याचे कारण काय असा सवाल विद्यापीठ वर्तुळात उपस्थित केला जातो आहे.

मुळात अधिसभा निवडणुकीला वर्षभराची स्थगिती दिल्याने महत्त्वाचे निर्णय घेणारी विद्यापीठाची सर्व अधिसभा, विद्वत सभा, व्यवस्थापन परिषद आदी महत्त्वाच्या प्राधिकरणाचा कारभार हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या नियुक्त सदस्यांच्या मर्जीने चालतो आहे. त्यात विद्यापीठासह संलग्नित सुमारे ७५० महाविद्यालयांच्या वर्षभराच्या शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम होईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची गरजच काय असा सवाल एका प्राध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला. कारण, सध्या विद्यापीठ व महाविद्यालये गणेश चतुर्थी आणि विसर्जन या दोन सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीच बंद असतात. त्यातच ही नऊ दिवसांची सुट्टी पहिल्या सत्रात असणार आहे. त्यामुळे, पहिल्या सत्राचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त होते आहे.