18 January 2021

News Flash

फिरत्या चित्रपटगृहांसाठी वर्ष कोरडेच

यात्रा-जत्रांवरील निर्बंधांमुळे कर्मचारी बेरोजगार

(संग्रहित छायाचित्र)

मानसी जोशी

टाळेबंदीच्या शिथिलीकरणानंतर राज्यातील चित्रपटगृहे सुरू झाली असली तरी फिरती चित्रपटगृहे (टुरिंग टॉकीज) अद्यापही बंद आहेत. राज्यातील मंदिरे खुली केली असली तरीही गावागावांत भरणाऱ्या यात्रा-जत्रा बंदच असल्याने फिरत्या चित्रपटगृह व्यवसायासाठी यंदाचे वर्षही कोरडेच जाणार आहे. तर अपुरे शिक्षण, रोजगाराच्या इतर संधी कमी यामुळे या चित्रपटगृहांमधील कर्मचारी सध्या बेरोजगार झाले आहेत.

ग्रामीण भागातील जनतेचे मनोरंजन करणारी फिरती चित्रपटगृहे मुख्यत्वे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागातील जत्रांमध्ये जातात. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर राज्य सरकारने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली तरीही फिरत्या चित्रपटगृहांना (टुरिंग टॉकीज) परवानगी देण्यात आलेली नाही. फिरत्या चित्रपटगृहांसाठी महत्त्वाच्या असलेल्या यात्रा रद्द झाल्याने मार्चपासून सुरू होणारा तंबू मालकांचा हंगाम सलग दुसऱ्या वर्षीही कोरडा जाणार आहे. ‘बुलढाणा जिल्ह्य़ातील देऊळगावराजा येथे ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत भरणारा बालाजी महाराज उत्सवही करोनामुळे स्थगित झाला. राज्यातील चित्रपटगृहे सुरू झाल्यावर फिरत्या चित्रपटगृहांना परवानगी मिळेल, अशी आशा होती. मात्र आमची साफ निराशा झाली. करोनामुळे सात ते आठ महिने व्यवसायच नसल्याने आमच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतीच्या कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईवर दैनंदिन गरजा भागत नाहीत’, असे देऊळगावराजाच्या ‘आनंद टुरिंग टॉकीज’चे मालक नीरज कांबळे यांनी सांगितले.

‘फिरत्या चित्रपटगृहातील साहित्य वापरात नसल्याने खराब झाले आहे. पुन्हा ते सुरू करायचे असल्यास पाच लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या साहित्याच्या दुरुस्तीसाठीही आमच्याकडे पैसे नाही,’ असे चिखली येथील ‘सुमेध टुरिंग टॉकीज’चे महम्मद कासम नवरंगी यांनी सांगितले.

फिरत्या चित्रपटगृहांमध्ये काम करणारे कर्मचारी यात्रांचा हंगाम वगळता अन्य वेळी चित्रपट आणि मालिकांसाठी छोटीमोठी कामे करतात. ‘पण सध्या चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणादरम्यान मर्यादित मनुष्यबळाच्या बंधनाचा नियम असल्याने तेथे देखील या कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही,’ अशी खंत नाशिक येथील पुष्पांजली टॉकीजचे मालक संजय धाडवे यांनी व्यक्त  केली. ज्युनियर आर्टिस्ट, क्लॅपबॉय, लाइटमन अशी कामे  मिळायची मात्र तीही गेली आहेत. मुख्यत: ज्येष्ठ नागरिकांचे फार हाल झाले आहेत’, असे त्यांनी नमूद केले.

मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन

ग्रामीण भागातील जनतेला जत्रेत येणारी फिरती चित्रपटगृह हे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन आहे. मराठी, हिंदी आणि तमिळ भाषेतील डब केलेले चित्रपट इथे सर्वात जास्त पाहिले जातात. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘सैराट’, ‘दुनियादारी’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या मागणीस्तव पुन्हा पुन्हा दाखवले जातात. सचिन पिळगावकर, सिद्धार्थ जाधव, अशोक सराफ, दादा कोंडके, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, अलका कुबल, तृप्ती भोईर, तेजा देवकर, अनिता नाईक आणि हिंदीत मिथुन चक्रवर्ती, अक्षय कुमार यांचे चित्रपट जत्रेत जास्त पाहिले जातात.

लाखो रुपयांचे नुकसान

गावागावांतून भरणाऱ्या या जत्रांमध्ये मोठे अर्थकारण दडलेले आहे. साधारण नऊशे प्रेक्षक बसतील एवढी क्षमता असणाऱ्या फिरत्या चित्रपटगृहाचे शुल्कही तीस रुपये एवढे माफक असल्याने गावक ऱ्यांना परवडते. फिरत्या चित्रपटगृहात दिवसा चार आणि रात्री दोन असे एकूण सहा खेळ होतात. एक जत्रेत पंधरा दिवस ते एक महिन्यात एका चित्रपटगृहाचा सहा ते सात लाख रुपयांचा व्यवसाय होतो. त्यात कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांचा जेवणा-राहण्याचा आणि चित्रपटाचा खर्च यातून साठ हजार ते एक लाख रुपये तंबू मालकांच्या हाती येतात. मात्र गावोगावी उभी राहिलेली चित्रपटगृहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळलेले प्रेक्षक आणि तुलनेने मिळणारे तुटपुंजे उत्पन्न या कारणांमुळे तंबू मालकांची दुसरी पिढी हा व्यवसाय पुढे चालवण्यास तयार नसल्याची खंत तंबू मालक संजय धाडवेंनी व्यक्त केली.

फिरत्या चित्रपटगृहांच्या दृष्टीने महत्त्वाच्या जत्रा

’वाशिम येथील ‘लोणी सखाराम महाराज’, ‘मंगरुळपीर’ आणि ‘काळामाता यात्रा’ ’बुलढाणा येथील ‘सैलाणी’, जळगाव येथील ‘शेंगोळा’ ’जालन्याची ‘नळणी’ आणि ‘मोठा महादेव’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:17 am

Web Title: this year is dry for mobile cinemas abn 97
Next Stories
1 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रोहिणी गोडबोले यांचे अभिनंदन
2 ‘व्हिडिओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर तोंड बंद होतील’, रेणू शर्मा यांच्या वकिलाचा दावा
3 धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल कुठलीही चर्चा नाही – जयंत पाटील
Just Now!
X