आषाढी वारी ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा असून जनतेच्यावतीने विठ्ठलाचा सेवक म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला येथे मुख्य शासकीय पुजेचा मान दिला जातो. या वारीला आणि भागवत धर्माला छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील संरक्षण दिले होते. मात्र, आता काही लोक यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे मला महापुजेसाठी पंढरपुरात जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणाले, आषाढी एकादशीची शासकीय पुजा मुख्यमंत्र्यांनी करावी असी परंपरा आहे. मात्र, यावर्षी काही संघटनांनी मी पुजा करायला जाऊ नये, अशी भुमिका घेतली आहे. मात्र, त्यांची ही भुमिका चुकीची आहे. वारकऱ्यांना वेठीस धरुन अशा मागण्या करणे योग्य नाही. विठ्ठलाची पुजा करण्यापासून मला कोणाही रोखू शकत नाही. मात्र, १० लाख लोकांच्या जीवाला धोका असल्याने मी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढीच्या दिवशी वारकऱ्यांमध्ये काही लोक घुसून चेंगराचेंगरी घडवण्याचा डाव असल्याचे पोलिसांकडून माहिती मिळते आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोवर मेगा भरती रद्द करावी अशी मागणीही केली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेल असे तत्वतः मानून १६ टक्के पदे भरली जाणार आहेत. बॅकलॉग समजून ही आरक्षणाची पदे भरण्यात येतील. मात्र, जर ही भरती थांबवण्यात आली, तर एससी, एसटी, ओबीसींचे नुकसान होईल तसेच यामुळे शेवटची संधी असलेल्या मराठा तरुणांचे मोठे नुकसान होईल, त्यामुळे अशी मागणी करु नये.

मराठा समाजाला आरक्षण देणे हे सरकारच्या हातात राहिलेले नाही, ते सर्वस्वी मागासवर्गीय आयोग आणि कोर्टाच्या हाती असल्याचे स्पष्ट आहे. हे काही पक्षांना माहिती असतानाही ते समाजाची दिशाभूल करीत आहेत, सत्य सांगत नाहीत. त्यामुळे स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांचा बुरखा यामुळे टराटरा फाटलेला आहे.