शिवसेनेने महिलांचा अपमान केला असा अरोप करणाऱ्यांनी मुंबईचा आणि मुंबा देवीचा अपमान केला आहे., बाळासाहेबांनी आम्हाला महिलाच्या सन्मासाठी लढायला शिकवलं आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सुरु झालेल्या वादामध्ये कंगनाविरोधात प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी वापरलेल्या एका शब्दावरुन अनेकांनी त्यांच्या टीकेवर आक्षेप नोंदवल्यानंतर राऊत यांनी आज ट्विटवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

“शिवसेनेने हिंदुत्वाचे आदर्श असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या महान पुरुषांच्या विचारसरणीनुसार वाटचाल केली आहे. त्यांनी आम्हाला महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. मात्र काहीजण मुद्दाम शिवसेनेने महिलांचा अपमान केला अशी माहिती पसरवत आहे. मात्र सर्वांनी एक गोष्ट विसरता कामा नये की असे आरोप करणाऱ्यांनी मुंबईचा आणि मुंबा देवीचा अपमान केला आहे. शिवसेना महिलांच्या सन्मासाठी लढत राहील, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हीच शिकवण दिली आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ट्विटवरुन दिली आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातून साधला निशाणा

आज (७ सप्टेंबर २०२०) ‘सामना’च्या अग्रलेखामधून कंगना रणौत  आणि विरोधकांवर टीका केली आहे.  “विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, कंगना रणौत अशा ‘राष्ट्रीय हितांच्या’ विषयांवर प्रश्न उपस्थित केले जातील. खरे तर ‘मुंबई’ म्हणजे पाकव्याप्त कश्मीर वगैरे विधान करून समस्त मराठी जनांचा, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात? मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी. मुंबईचा व पोलिसांचा अवमान करणाऱया त्या ‘मेंटल’ महिलेस महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री ठणकावून सांगत असतील, तर तीच महाराष्ट्राची लोकभावना आहे हे मान्य करावे लागेल. गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त व संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस ‘माफिया’ आहेत असे विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी शिवसेनेनं अग्रलेखातून केली आहे.