“ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही त्यांनी ईव्हीएमवर भाष्य करु नये,” अशा शब्दांत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनचा (ईव्हीएम) वापर करण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना शेलार यांनी हे विधान केले आहे.

शेलार म्हणाले, “ईव्हीएमविरोधात राज्यातील विरोधीपक्षांनी घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिली. यावर माझी प्राथमिक प्रतिक्रिया हीच आहे की, अशी पत्रकार परिषद घेण्याआधी जे या ईव्हीएमद्वारेच निवडून आले आहेत त्याविरोधी पक्षातल्या बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी आधी राजीनामे द्यावेत तसेच या पत्रकार परिषदेत इतर जे कोणी होते त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही त्यांनी तर ईव्हीएमवर बोलूच नये,” अशा खोचक शब्दांत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

“विरोधकांना जनाधार राहिलेला नाही, लोक त्यांना स्विकारायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. त्यामुळे ते ईव्हीएमवर टीका करीत आहेत. त्यांनी आधी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे. भाजपा आणि शिवसेनेविरोधात एकत्र येऊन ते तोंडावर पडले आहेत. आपल्या निवडणूक आयोग नावाच्या संविधानिक यंत्रणेचे जगात कौतूक होत असताना त्यावर हे अविश्वास निर्माण करीत आहेत,” अशा शब्दांत शेलार यांनी विरोधकांना झापले.

“पूर्णपणे कोसळलेले असताना विरोधकांचा एकमेकांना शेवटचा आधार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. काळोखात चालताना पडू नये म्हणून एकमेकांना विचारात, चाचपडत चालावे लागते तशी अवस्था विरोधी पक्षांची आजच्या पत्रकार परिषदेतून दिसून आली. जे घरातून बाहेर प़डत नव्हते ते दुसऱ्याच्या घरात का घुसत आहेत?” याचा विचार त्यांनी करावा, अशा शब्दांत शेलार यांनी राज ठाकरेंसह विरोधकांवर सडकून टीका केली.