‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या ईशान्येकडील राज्यांतील स्त्री-पुरुष दिसायला फारच सुंदर असतात, त्यांच्या दिसण्यावरून त्यांचं वय अजिबात सांगता येत नाही आणि कुठलेही विकार त्यांना लवकर जडत नाहीत. याचं गुपित त्यांच्या खाद्यसंस्कृतीत लपलेलं आहे. शाकाहारी असो वा मासांहारी. तिथे पदार्थ अधिकाधिक उकडूनच खाल्ले जातात. त्यात मसाल्यांचा वापर जवळपास नसतोच. त्यामुळे निसर्गात जे मिळतं तसंच खायचं याबाबतीत ते अगदी काटेकोर असतात.

सांताक्रुझमधील ‘थॉट्रीन कॅफे’ या छोटेखानी हॉटेलमध्ये तुम्हाला नागा पद्धतीचे पदार्थ खायला मिळतील. ‘थॉट्रीन कॅफे’ हे झिमिक यांच्या कुटुंबाच्या वतीने चालवले जाते. झिमिक हे मणिपूर आणि म्यानमार सीमेवरील नूनगाव आणि फल्ली या गावातील तांगखुल जमातीचे आहेत. दिसायला आकर्षक आणि चविष्ट वाटणारे नागा पदार्थ खाताना मात्र तुमचा कदाचित हिरमोड होऊ  शकतो, याची सुरुवातीलाच कल्पना दिलेली बरी! सवय नसल्याने कदाचित ते पदार्थ अगदीच बेचव, कडू (काही भाज्यांची चव तशीच आहे) वा तिखट (किंग नागा मिरची ही सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली जाते.) असू शकतील. पण जर तुम्हाला नागालँडच्या लोकांची खाद्यसंस्कृती मुंबईत बसून अनुभवायची इच्छा असेल तर एकदा तरी या कॅफेला आवर्जून भेट द्यायला हवी. कांदा, लसूण, बटाटा, कोबी, केळं आणि मांस या गोष्टी सोडल्या तर भाज्या, मासे (नदीचे), मसाले, तांदूळ या सर्व गोष्टी थेट नागालँडवरून इथल्या किचनमध्ये दाखल होतात.

इथला बनाना ज्यूस नक्की प्यायला हवा. सोललेली केळी आणि त्यात थोडी साखर टाकून आपण ज्याप्रमाणे लोणचं मुरवायला ठेवतो, त्याप्रमाणे साधारण आठवडाभर फक्त हे दोन घटक एका मोठय़ा बरणीत आठवडाभर ठेवले जातात. वाईनच्या चवीच्या जवळपास जाणारा हा ज्यूस म्हणजे अफलातून प्रकार आहे.

नागा लोकांचा ब्रेडही वेगळा. काळा आणि पांढऱ्या तांदळाचा चिकचिकीत भात वापरून तो तयार केला जातो. मुख्य म्हणजे दोन्ही भात आणि थोडीशी साखर एकत्र मळून घेतल्यानंतर त्याचा गोळा बनवून तो वडय़ासारखा तळला जातो. हा ब्रेड चहा आणि कॉफीसोबत छान लागतो. हे दोन-तीन ब्रेड खाल्लय़ास दिवसभर कामाची ऊर्जा मिळते, असा त्यांचा दावा आहे.

नागा एग प्लांट हे चवीला थोडं कडू फळ आहे, पण ‘थाई करी’मध्ये त्याचा सर्रास वापर केला जातो. तोदेखील तुम्हाला इथे एका वेगळ्या फॉर्ममध्ये चाखायला मिळेल. इरोंबा नावाच्या प्रकारात एका विशिष्ट बियांसोबत बटाटे, मिरची, कांदा वापरून वांग्याच्या भरत्यासारखं मिश्रण करून तो भातासोबत दिला जातो. ईशान्येकडील भागात ज्या गोष्टी ज्या हंगामात पिकतात त्या खाल्ल्या जातात. त्यामुळे इथला मेन्यूही हंगामी आहे.

इस्कागो म्हणजेच छोटय़ा छोटय़ा गोगलगायींचा एक भन्नाट प्रकार जरूर चाखा. भाज्यांसोबत शिजवलेल्या या प्रकारात ‘पोर्क’सुद्धा असतं. छोटय़ा शंखांच्या पोटात दडलेला मसाला चोखून खायला मजा येते. त्याच्यासोबतचं सूप नुसतंच पिऊ  शकता वा भातासोबतही खाऊ  शकता.

ल्हासा चिकन ही तिबेटियन डिश असली तरी फार मसाल्यांचा वापर न करता ती तयार केली जाते. शिंगजू हा प्रकार म्हणजे कोबी आणि उकडलेल्या पांढऱ्या वाटाण्याचं सलाड. मिरची, सिसमी, शेंगदाणे यांच्या तडक्याचं त्यात मिश्रण असतं.

स्टीम चिकन विथ बाम्बू शूट, वाइल्ड मशरूम, थॉट्रीन राईस, नानकिंग राईस, ओक्रा पोटॅटो हे कुठल्याही मेन्यूमध्ये न दिसणारे पदार्थही आहेतच. त्याशिवाय जर तुम्हाला चायनीज पद्धतीचे पदार्थ खायचे असतील तर त्यांचाही मेन्यूमध्ये समावेश आहेच.

थॉट्रीन कॅफे

  • कुठे – शास्त्रीनगर पालिका शाळा संकुलासमोर, जामळीपाडा, विद्यानगरी, कलिना, सांताक्रुझ (पूर्व)
  • कधी – सोमवार ते रविवार सकाळी ११ ते रात्री १२ पर्यंत.

anawareprashant@gmail.com

@nprashant