News Flash

‘जेट’चे एक हजार वैमानिक संपावर ठाम

थकीत वेतनामुळे आक्रमक; सेवा कोलमडण्याचे संकेत

थकीत वेतनामुळे आक्रमक; सेवा कोलमडण्याचे संकेत

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे वैमानिक १ एप्रिलपासून काम बंद आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. थकीत वेतन चुकते करण्याच्या मागणीसाठी वैमानिकांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे ‘जेट’ची सेवा कोलमडण्याचे संकेत आहेत.

चार महिन्यांपासून अनियमित वेतन मिळत असल्याने जेट एअरवेजच्या वैमानिक आणि अभियंत्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला होता. जेट एअरवेजने ३१ मार्चपर्यंत थकीत वेतन न दिल्यास आणि कंपनीने आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत योजना सादर न केल्यास १ एप्रिलपासून आंदोलन करण्याची भूमिका ‘नॅशनल अ‍ॅव्हिएटर्स गिल्ड’ने मांडली होती. या संघटनेत जेटच्या १,१०० वैमानिकांचा समावेश आहे.

या पाश्र्वभूमीवर कर्जातून बाहेर पडण्यासाठीच्या योजनेनुसार कंपनीचे नेतृत्व कर्जदात्या एसबीआयकडे आले. त्यामुळे २९ मार्चपर्यंत निधी हस्तांतरित होऊन वेतन मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही आणि जेटचे  कर्मचारी वेतनापासून वंचितच राहिले. त्यामुळे जेटचे वैमानिक, अभियंते, केबिन क्रू सह सर्वच कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त करत १ एप्रिलपासून संपाच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे ‘नॅशनल अ‍ॅव्हिएटर्स गिल्ड’चे अध्यक्ष करन चोप्रा यांनी सांगितले.

जेट एअरवेजच्या २०० वैमानिकांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसे वेगवेगळे पत्र त्यांनी जेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांना पाठवले आहे. मात्र आपल्याकडे पुरेसे वैमानिक असून, सोमवारी विमानसेवेवर परिणाम होणार नसल्याचा दावा जेट एअरवेज कंपनीने केला आहे.

मुंबई विमानतळावरील फेऱ्यांमध्ये घट

कर्जबाजारी झालेल्या जेट एअरवेजच्या काही विमान फेऱ्या होत नसल्याने आणि बोइंग ७३७ मॅक्सच्या विमानांवरील बंदीमुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई विमानतळावरील दररोजच्या विमान फेऱ्यांमध्येही घट झाली आहे. मुंबई विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या आणि उतरणाऱ्या विमानांची रोजची संख्या ९८० आहे. मात्र, ही संख्या सध्या ७८० वर पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 12:10 am

Web Title: thousands of jet airways pilots on strike
Next Stories
1 सांगली मतदारसंघ स्वाभिमानीकडेच
2 धक्कादायक! भाईंदरमध्ये माथेफिरू मुलाने केली ८५ वर्षांच्या आईची हत्या
3 जयदत्त क्षीरसागर यांच्या कारला आठवेळा दंड, मात्र वसुली एकदाही नाही?
Just Now!
X