24 October 2020

News Flash

पावसामुळे हजारो किलो झेंडू वाया

करोना संसर्गाच्या भीतीने ग्राहकांचीही पाठ

करोना संसर्गाच्या भीतीने ग्राहकांचीही पाठ

मुंबई : गेले दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे शेतातील झेंडू भिजल्याने शेतकऱ्यांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले. दुसरीकडे करोना संसर्गाच्या भीतीपोटी ऐन नवरात्रोत्सवातही ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नसल्याने व्यापाऱ्यांची कोंडी झाली. परिणामी शनिवारी हजारो किलो झेंडू दादरच्या फुलबाजाराबाहेरील रस्त्यावर फेकून देण्यात आला. हा कचरा खतनिर्मितीसाठी धारावी येथे पाठविण्यात आला आहे.

झेंडूच्या फुलांमध्ये पाणी गेल्यानंतर ती सुकायला वेळ लागतो. मात्र घटस्थापनेच्या दिवशी झेंडूची फुले बाजारात जाणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांनी ओला झेंडूच मुंबईकडे रवाना केला.

टाळेबंदीमुळे सध्या मंदिरे बंद आहेत, देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणाऱ्या सार्वजनिक मंडळांचाही उत्साह ओसरला आहे. त्यामुळे शनिवारी दादरच्या फुलगल्लीत झेंडूच्या खरेदीसाठी फारसे गिऱ्हाईक नव्हते.

जी थोडीफार खरेदी झाली त्यात ओल्या झेंडूला किंमत मिळाली नाही. माल वाहून आणणाऱ्या गाडय़ांना आपल्या क्रेट रिकामी कराव्याच लागतात. त्यामुळे त्यांनी झेंडूचा सर्व माल रस्त्यावर फेकला.

झाले काय?

* सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांतून मुंबईत झेंडूचा पुरवठा होतो. प्रत्येक गाडीत साधारण ५ हजार किलो झेंडू, याप्रमाणे १५ ते २० गाडय़ा शनिवारी मुंबईत दाखल झाल्या. मात्र झेंडू ओला असल्याने आणि गिऱ्हाईक नसल्याने ही सगळी फुले  फेकून द्यावी लागली.

* ‘सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या झेंडूला दरवर्षीच्या तुलनेत १० ते २५ टक्केच उठाव आहे. मंदिरे उघडली असती तर खूप मोठा फरक पडला असता,’ अशी माहिती दादर फूलबाजाराचे कार्याध्यक्ष राजेंद्र हिंगणे यांनी दिली.

* प्रत्येक क्रेटसाठी ८० रुपये याप्रमाणे प्रत्येक गाडीसाठी शेतकऱ्यांनी साधारण २० हजार रुपये वाहतूक खर्चही केला आहे, असेही त्यांनी सांगितले. यामुळे यंदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे.

* दरम्यान, पालिकेने हा फुलांचा कचरा धारावी येथील खतनिर्मिती प्रकल्पात रवाना केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 1:28 am

Web Title: thousands of kilos of marigold wasted due to rains zws 70
Next Stories
1 Coronavirus : मुंबईत दिवसभरात १,७९१ करोनाबाधित
2 मेळघाटमधील आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘नीट’मध्ये यश
3 पूर्व उपनगरात वायुगळती?
Just Now!
X