|| निलेश अडसूळ

देखभालीवर वर्षभरात लाखोंचा खर्च; वाहनतळाच्या भाड्यापोटीही हजारोंचा भुर्दंड

मुंबई : गेल्या वर्षी मार्चमध्ये नाट्य व्यवसायाचे थांबलेले अर्थचक्र वर्षभरानंतरही सुरळीत होऊ न शकल्याने प्रयोगांअभावी नाटकाच्या बस धूळ खात पडल्या आहेत. उत्पन्न शून्य असताना वर्षभरात लाखो रुपयांचा खर्च या गाड्यांच्या देखभालीवर आणि वाहनतळाच्या भाड्यापोटी करावा लागत आहे. पांढरा हत्ती बनलेल्या या बसगाड्यांमुळे निर्मात्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. परिणामी, नाटकाच्या गाड्यांसाठी हक्काचे वाहनतळ मिळावे, अशी निर्मात्यांची मागणी आहे.

राज्य सरकारने नाट्य प्रयोगांना परवानगी दिल्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये नाटकांचे प्रयोग पुन्हा सुरू झाले. परंतु काही तुरळक प्रयोग झाले आणि पुन्हा करोनाचे संकट ओढावले. परिणामी, गेले १४ महिने नाटकाच्या बसगाड्यांनी मुंबईची वेस ओलांडलेलीच नाही. किंबहुना बहुतांशी बस या काळात वाहनतळावरच उभ्या आहेत.

कॉटन ग्रीन येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी)च्या जागेवर या बसगाड्या उभ्या करण्यात येतात. ही जागा बीपीटीने एका खासगी कंत्राटदाराला दिल्याने त्याला एका बससाठी महिना चार हजार रुपये वाहनतळ शुल्क द्यावे लागले. नाट्यसृष्टीत एकूण १२ बसगाड्या आहेत, तर काही निर्मात्यांकडे बस आणि टेम्पोही आहेत. नाटक बंद असताना या वाहनांचा देखभाल खर्च, कर, वाहनतळाचे शुल्क, चालकाचा पगार या गोष्टींची पूर्तता करणे निर्मात्यांच्या गळ्याशी आले आहे. ‘जानेवारी २०२१ मध्ये निर्मात्यांनी तेथील कंत्राटदाराची मनधरणी के ली, परिस्थितीची कल्पना देऊन पाच महिन्यांसाठी शुल्कात सवलत मिळवली होती. परंतु येत्या ३१ मेला ती सवलत संपणार असल्याने यातून कसा मार्ग काढायचा असा प्रश्न निर्मात्यांपुढे असल्याचे व्यवस्थापक प्रवीण बोडके यांनी सांगितले.

वयोमान मर्यादा वाढवण्याची मागणी

नाटक बंद झाल्याने १४ महिने गाड्या एका जागेवर उभ्या आहेत. पुढे किती काळ नाटक बंद राहील हे सांगणे कठीण आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार नाटकाच्या बस मुंबईत केवळ आठ वर्षे चालविण्याची परवानगी आहे. आतापर्यंत त्यातले  एक वर्ष करोनाकाळातच गेल्याने, ही मर्यादा वाढवावी अशी मागणी निर्मात्यांकडून करण्यात येत आहे. ‘नाटकाच्या एका बससाठी किमान ३५ ते ४० लाख रुपये खर्च येतो. प्रवासी गाड्यांप्रमाणे या बस धावत नाहीत. तरीही अवजड वाहनांच्या नियमानुसार या बसलाही मुंबईत के वळ आठ वर्षेच चालवण्याची परवानगी आहे. त्यामुळे ही मर्यादा आठ वर्षांवरून १२ वर्षापर्यंत वाढवावी,’ अशी विनंती जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने परिवहन मंत्री अनिल परब यांना के ली आहे.

खर्च किती?

चालकाला दरमहा २० हजार रुपये पगार, चार हजार रुपये मासिक वाहनतळ शुल्क, वार्षिक खर्चामध्ये ७० हजार रुपयांचा विमा, १३ हजार रुपये कर, वार्षिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये असे मिळून वर्षाला एका बससाठी अंदाजे चार लाख रुपये खर्च निर्माते करीत असतात. गेल्या वर्षभरात गाड्या केवळ उभ्या असतानाही निर्मात्यांना हा खर्च पेलावा लागला आहे.

बीपीटीकडून आशा

‘नाटकाच्या बस, टेम्पो उभ्या करण्यासाठी मुंबईत निर्मात्यांना हक्काचे वाहनतळ हवे आहे. खासगी जागेसाठी महिना चार हजार रुपये भरणे निर्मात्यांना परवडण्यासारखे नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टकडे (बीपीटी) बरीच जागा शिल्लक आहे. त्यामुळे बीपीटीने नाट्यसृष्टीला सवलतीच्या दारात ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ पाठपुरावा करत असल्याचे, निर्माता संघाचे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी सांगितले.